हृदयद्रावक! लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात आई-मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 16:01 IST2023-01-17T16:00:31+5:302023-01-17T16:01:03+5:30
एका लग्न समारंभातून हरियाणातील यमुनानगरला परतत असताना कुटुंबाचा भीषण अपघात झाला आहे.

फोटो - news18 hindi
हरियाणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. आई आणि मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लुधियानाच्या माछीवाडा येथे एका लग्न समारंभातून हरियाणातील यमुनानगरला परतत असताना कुटुंबाचा भीषण अपघात झाला आहे. याच दरम्यान अंबाला येथील यमुनानगर रस्त्यावरील तेपलाजवळ उभ्या असलेल्या ट्रॉलीवर मागून कार आदळली. या घटनेत 10 वर्षीय अकुल अग्रवाल आणि त्याची आई पूनम यांचा जागीच मृत्यू झाला.
कार चालवत असलेल्या कपिल अग्रवाल यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी अंबाला कँट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या नातेवाईकांनीही अंबाला कँट सिव्हिल हॉस्पिटल गाठले. कपिल अग्रवाल हा त्याचा चुलत भाऊ असल्याचे नातेवाईक मनमोहन यांनी सांगितले. पत्नी पूनम, मुलगा अकुल, आई शशी अग्रवाल आणि मुलगी शानू पंजाब येथील लग्न समारंभातून यमुनानगरला परतत होते.
कार अंबालाजवळील तेपला येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॉलीला धडकली. या अपघातात कपिल यांची पत्नी आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. कपिलची आई, त्याची मुलगी आणि कपिल जखमी झाले आहेत. साहा पोलीस स्टेशन प्रभारी यशदीप सिंग दलबल घटनास्थळी पोहोचले आणि लोकांच्या मदतीने जखमींना गाडीतून बाहेर काढून अंबाला कँट रुग्णालयात नेले.
एसएचओ यशदीप सिंह यांनी सांगितले की, सकाळी डायल 112 वरून कॉल आला होता. दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. हे कुटुंब पंजाबमधील एका लग्न समारंभातून परतत होते. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना नोटिसा दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रॉली रस्त्याच्या बाहेर बाजूला उभी होती, तरीही कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"