अॅमेझॉनकडून कर्मचारी कपात सुरू; भारतात 60 कर्मचाऱ्यांना नारळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:10 IST2018-04-03T14:06:08+5:302018-04-03T14:10:52+5:30
येत्या काही दिवसांमध्ये अॅमेझॉनकडून आणखी काही कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो

अॅमेझॉनकडून कर्मचारी कपात सुरू; भारतात 60 कर्मचाऱ्यांना नारळ
ई-कॉमर्स क्षेत्रातील मातब्बर कंपनी असलेल्या अॅमेझॉनने भारतातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने गेल्याच आठवड्यात 60 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. अॅमेझॉनकडून सध्या विविध देशांमधील त्यांच्या कारभाराचा आढावा घेतला जात आहे. याच अंतर्गत कंपनीने भारतातील कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी आले आहे.
येत्या काही दिवसांमध्ये अॅमेझॉनकडून आणखी काही कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, अशी माहिती कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. यासाठी कंपनीने 25 टक्के कर्मचाऱ्यांचा समावेश पर्फॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लानमध्ये केला आहे. 60 कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करण्यात आल्याच्या वृत्ताला अॅमेझॉन इंडियाकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. जागतिक स्तरावर कंपनीच्या ढाच्यात काही बदल केले जात असल्याची माहिती कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्याच अंतर्गत ही कर्मचारी कपात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 'इकॉनॉमिक टाईम्स'ने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
एक जागतिक कंपनी असल्याने सुनियोजितपणे टीमची उभारणी करण्याची गरज असल्याचे आमच्या लक्षात आले आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. 'उपलब्ध क्षमतेचा संपूर्ण वापर करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत. याचा परिणाम काही कर्मचाऱ्यांवर झाला आहे. त्या कर्मचाऱ्यांना आम्ही पूर्ण सहाय्य करत आहोत,' अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली.
अॅमेझॉनने याच वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात सिएटलस्थित मुख्यालयातील काही कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. त्यावेळीच याचा परिणाम भारतासह जगभरात दिसेल, अशी शक्यता व्यापार जगतात व्यक्त करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी अॅमेझॉनने भारतातील व्यवसायाचा नव्याने प्रारंभ करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळेच अॅमेझॉनने काही कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.