पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या औषधात विष; 'या' सिरपच्या विक्रीवर बंदी, सापडले घातक केमिकल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 15:54 IST2026-01-10T15:54:10+5:302026-01-10T15:54:58+5:30
मुलांच्या आरोग्याशी संबंधित एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.

पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या औषधात विष; 'या' सिरपच्या विक्रीवर बंदी, सापडले घातक केमिकल
मुलांच्या आरोग्याशी संबंधित एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणा औषध नियंत्रण प्रशासनाने (DCA) मुलांना दिल्या जाणाऱ्या 'अल्मोंट-किड' (Almont-Kid) सिरपच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या सिरपमध्ये 'इथिलीन ग्लायकॉल' नावाचं अत्यंत विषारी केमिकल आढळल्याचं विभागाने एका ॲडव्हायझरीमध्ये म्हटलं आहे.
कोलकाता येथील केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (CDSCO) लॅब रिपोर्टनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. बिहारमधील ‘ट्रिडस रेमेडीज’ या कंपनीने उत्पादित केलेल्या बॅच नंबर AL-24002 मधील औषध भेसळयुक्त आणि जीवघेणं असल्याची पुष्टी या अहवालात करण्यात आली आहे. सामान्यतः हे सिरप मुलांमधील ॲलर्जी, 'हे फिव्हर' आणि अस्थमाच्या उपचारांसाठी डॉक्टरांकडून लिहून दिलं जातं.
तपासणीत काय आढळलं?
तपासणीदरम्यान या सिरपमध्ये इथिलीन ग्लायकॉलचं प्रमाण ठराविक मानकांपेक्षा खूप जास्त असल्याचं दिसून आलं. तज्ज्ञांच्या मते, इथिलीन ग्लायकॉल हे एक औद्योगिक द्रावण आहे, ज्याचा वापर अँटी-फ्रीझ आणि कूलंट तयार करण्यासाठी केला जातो. हे केमिकल शरीरात गेल्यास किडनीचं गंभीर नुकसान होऊ शकतं, मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो आणि विशेषतः मुलांसाठी ते प्राणघातक ठरू शकते.
प्रशासनाचे पाऊल आणि आवाहन
राज्यातील सर्व औषध निरीक्षकांना मेडिकल स्टोअर्स, वितरक आणि रुग्णालयांतून या विशिष्ट बॅचचा साठा त्वरित जप्त करण्याचे आणि विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाने पालकांना आवाहन केलं आहे की, जर त्यांच्याकडे 'अल्मोंट-किड' सिरपचा बॅच नंबर AL-24002 असेल, तर त्याचा वापर अजिबात करू नका आणि त्वरित औषध नियंत्रण अधिकाऱ्यांना याची माहिती द्या.
कायदेशीर कारवाई सुरू
भेसळयुक्त औषधांचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या संबंधित कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मुलांच्या औषधांमधील अशा प्रकारच्या भेसळीमुळे देशातील औषध नियामक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकांच्या सोयीसाठी प्रशासनाने एक टोल-फ्री क्रमांक देखील जारी केला आहे, जेणेकरून कोणत्याही संशयास्पद औषधाची माहिती त्वरित देता येईल.