"राहुल गांधींवर भाजपाच्या महिला खारदाराने केलेले आरोप बिनबुडाचे’’, काँग्रेस खासदाराचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 20:32 IST2024-12-19T20:32:06+5:302024-12-19T20:32:44+5:30
BJP Vs Congress News: राहुल गांधी यांनी गैरवर्तन केल्याची तक्रार कोन्याक यांनी सभापतींकडे लेखी तक्रार केली आहे. दरम्यान, भाजपा खासदार कोन्याक यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा काँग्रेस खासदार हिबी इडेन यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून केला आहे.

"राहुल गांधींवर भाजपाच्या महिला खारदाराने केलेले आरोप बिनबुडाचे’’, काँग्रेस खासदाराचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आज संसदेच्या प्रवेशद्वारावर सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षामधील काँग्रेसच्या खासदारांमध्ये अभूतपूर्व धक्काबुक्कीची घटना घडली. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत हे जखमी झाले. दोन्ही खासदारांनी राहुल गांधींवर धक्काबुक्कीचा आरोप केला. तसेच भाजपाच्या राज्यसभा खासदार फेंगनॉन एस. कोन्याक यांनीही राहुल गांधींवर गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी गैरवर्तन केल्याची तक्रार कोन्याक यांनी सभापतींकडे लेखी तक्रार केली आहे. दरम्यान, भाजपा खासदार कोन्याक यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा काँग्रेस खासदार हिबी इडेन यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून केला आहे.
हिबी इडेन यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं असून, त्यात त्या्ंनी राहुल गांधींवर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मी सुरुवातीपासून राहुल गांधी यांच्यासोबत होतो. भाजपाच्या महिला खासदाराने राहुल गांधी हे आपल्या जवळ आल्याचा आणि त्यामुळे आपण असहज झाल्याचा दावा केला आहे. मात्र असं घडलेलं नाही. हे आरोप बिनबुडाचे असून राहुल गांधी यांचं प्रतिमाभंजन करण्यासाठी करण्यात आलेले आहेत, असेही हिबी इडेन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नागालँडमधील भाजपाच्या राज्यसभा खासदार फेंगनॉन कोन्याक यांनी जगदीप घनखड यांची भेट घेऊन राहुल गांधी यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करत तक्रार दिली. त्यांनी आपल्या तक्रारीत लिहिले की, मी आज संसदेबाहेर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होते. तेव्हा राहुल गांधी माझ्या जवळ येऊन उभे राहिले. त्यामुळे मी अस्वस्थ झाले. राहुल गांधी माझ्यावर ओरडत होते. एका महिला खासदारावर अशा प्रकारे ओरडणं राहुल गांधी यांना शोभत नाही, असेही कोन्याक म्हणाल्या.