'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 17:26 IST2025-10-24T17:25:16+5:302025-10-24T17:26:07+5:30
संयुक्त राष्ट्र संघाच्या 80व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जोरदार टोला लगावला.

'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
United Nations 80th Anniversary: संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेच्या 80व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमातून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) व तिच्या सदस्य देशांवर थेट टीका केली. जयशंकर यांनी आरोप केला की, काही सदस्य देश दहशतवादी संघटनांना संरक्षण देतात, ज्यामुळे या आंतरराष्ट्रीय संस्थेची विश्वसनीयता धोक्यात येते.
संयुक्त राष्ट्रात सर्व काही सुरळीत नाही
आपल्या भाषणात जयशंकर म्हणाले, आपल्याला हे मान्य करावं लागेल की, संयुक्त राष्ट्रात सर्व काही ठीक सुरू नाही. त्याच्या निर्णयप्रक्रियेत सर्व सदस्य देशांचे योग्य प्रतिनिधित्व होत नाही आणि आजच्या जगातील प्रमुख गरजांकडे लक्षही दिलं जात नाही. संयुक्त राष्ट्रातील चर्चा अतिशय विभागलेल्या स्वरूपात होत आहेत. संस्थेचे कामकाजही ठप्प झालेलं दिसतंय. संस्थेची दहशतवादावरील भूमिका विश्वसनीयतेतील कमतरता उघड करते, असा स्पष्ट टोला त्यांनी लगावला.
Speaking at the UN@80 celebrations New Delhi.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 24, 2025
🇮🇳 🇺🇳
https://t.co/hRolVCiO1T
UN मध्ये बदल करण्याचे मोठे आव्हान
जयशंकर पुढे म्हणाले की, या उल्लेखनीय वर्धापनदिनानिमित्त आपल्याला निराश होता कामा नये. बहुपक्षीयतेप्रती आपली बांधिलकी कितीही त्रुटिपूर्ण असली, तरी ती ठाम राहिली पाहिजे. संयुक्त राष्ट्राला पाठबळ द्यायला हवे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यावरचा आपला विश्वास नवा करायला हवा. आजच्या काळातही आपण अनेक मोठ्या संघर्षांचे साक्षीदार आहोत. हे केवळ मानवी जीवावर परिणाम करत नाहीत, तर आंतरराष्ट्रीय समुदायालाही अस्थिर करतात. विशेषतः ‘ग्लोबल साउथ’ म्हणजेच विकसनशील राष्ट्रांनी या संघर्षांची पीडा खोलवर अनुभवली आहे. संयुक्त राष्ट्रात सुधारणा करणे ही आजच्या काळातली सर्वात मोठी आव्हानं आहेत, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
सुरक्षा परिषदेची विश्वसनीयता धोक्यात
जयशंकर यांनी दहशतवादाविषयी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. जेव्हा सुरक्षा परिषदेचा एखादा विद्यमान सदस्य पहलगामसारख्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या दहशतवादी संघटनांचं खुलेआम समर्थन करतो, तेव्हा बहुपक्षीय संस्थांची विश्वासार्हता कितपत उरते? जर जागतिक रणनीतीच्या नावाखाली दहशतवादाच्या पीडितांनाच समान दोषी ठरवलं जात असेल, तर जग किती स्वार्थी होऊ शकतं? हे यातून दिसून येतं, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.