धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 17:49 IST2025-11-10T17:49:01+5:302025-11-10T17:49:58+5:30
मानवी जवळपास एक तास बाथरूम बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी प्लंबरच्या मदतीने दरवाजा तोडला. तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला.

धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहावीची विद्यार्थिनी असलेल्या मानवी सिंहचा गॅस गिझरमुळे बाथरूममध्ये गुदमरून मृत्यू झाला. मानवी जवळपास एक तास बाथरूम बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी प्लंबरच्या मदतीने दरवाजा तोडला. तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला.
मानवी सिंहचे वडील देवेंद्र सिंग हे सैन्यात आहेत आणि सध्या जैसलमेरमध्ये तैनात आहेत. मानवी तिची आई नीतू सिंह आणि धाकटा भाऊ आरवसोबत शिवाजीपुरम कॉलनीत राहत होती. दोन दिवसांपूर्वीच मानवीचा वाढदिवस होता आणि घरी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र आता या घटनेने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. मानवी ओएलएफ स्कूलमध्ये शिकत होती.
देवेंद्र सिंह यांचा भाचा आयुषने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सुट्टी असल्याने मानवी घरीच होती. सकाळी ११:३० च्या सुमारास ती आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. मात्र एक तास झाला तरी ती बाहेर न आल्याने तिची आई नीतू सिंह यांना काळजी वाटली. त्यांनी हाक मारली पण मानवीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर प्लंबरला बोलावून बाथरूमचा दरवाजा तोडला.
दरवाजा तोडल्यानंतर मानवी बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिच्या कुटुंबियांनी तिला तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेलं, परंतु तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तज्ज्ञांच्या मते, बंद बाथरूममध्ये गॅस गिझर सुरू असल्यावर ऑक्सिजन कमी होतो आणि कार्बन मोनोऑक्साइड तयार होतो, ज्यामुळे गुदमरल्यासारखं होऊ शकतं. यामुळेच मानवीने आपला जीव गमावला असण्याची शक्यता आहे.