अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 16:02 IST2025-12-03T15:59:50+5:302025-12-03T16:02:20+5:30
अल-फलाह विद्यापीठात रोज मोठ्या संख्येने बोगस रुग्णांची यादी तयार केली जात असल्याचा धक्कादायक खुलासा एका माजी कर्मचाऱ्याने केला आहे

अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे
गेल्या महिन्यात लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या प्रकरणाचा तपास एनआयए अतिशय वेगाने करत आहे. या बॉम्बस्फोटामागे अल-फलाह विद्यापीठाशी जोडलेल्या काही लोकांची नावे समोर आल्याने तपास आता एका वेगळ्या दिशेने वळला आहे. या विद्यापीठात रोज मोठ्या संख्येने बोगस रुग्णांची यादी तयार केली जात असल्याचा धक्कादायक खुलासा एका माजी कर्मचाऱ्याने केला आहे, तसेच हिंदू कर्मचाऱ्यांशी भेदभाव केला जात असल्याची माहितीही समोर आली आहे. एनआयएने या प्रकरणात आतापर्यंत ७ मुख्य आरोपींना अटक केली आहे, तर ७३ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत.
मॅनेजमेंटच्या सांगण्यावरून बनावट फाईल्स
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल-फलाह विद्यापीठातील एका माजी नर्सिंग स्टाफने तपास यंत्रणांना महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. या कर्मचाऱ्याने सांगितले की, विद्यापीठाच्या रुग्णालयात दररोज १०० ते १५० बनावट रुग्णांच्या फायली तयार केल्या जात होत्या. हे सर्व काम थेट व्यवस्थापनाच्या आदेशानुसार केले जात होते. यात सहकार्य न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जायचा आणि आदेशाचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गैरहजर दाखवून त्यांचा पगार कापला जायचा, असा मोठा दावाही या माजी कर्मचाऱ्याने केला आहे.
'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे आणि हिंदू स्टाफसोबत भेदभाव
या माजी कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हिंदू कर्मचाऱ्यांशी भेदभाव केला जात होता. विशेषतः रात्रीच्या शिफ्टमध्ये कश्मीरी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात असे आणि त्यापैकी काही डॉक्टर पाकिस्तानचे उघडपणे कौतुक करत असत. सर्वात गंभीर बाब म्हणजे, अनेक वेळा रुग्णालयाच्या परिसरात 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे ऐकू आल्याचेही त्याने सांगितले आहे, ज्यामुळे या संस्थेच्या हेतूवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
डॉक्टर उमर उन नबी आहे मुख्य सूत्रधार
१० नोव्हेंबर रोजी झालेल्या या जोरदार बॉम्बस्फोटात १५ लोकांचा मृत्यू झाला होता. हा बॉम्बस्फोट कथित आत्मघाती हल्लेखोर उमर उन नबी याने टी२० कारमध्ये स्फोटकांचा वापर करून घडवून आणला होता. डॉक्टर उमर हा जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी असून, तो हरियाणातील फरीदाबाद येथील याच अल-फलाह विद्यापीठाच्या सामान्य चिकित्सा विभागात असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होता.
हा संपूर्ण प्रकार जम्मू-काश्मीर पोलिसांनी उघड केलेल्या एका 'सफेदपोश दहशतवादी मॉड्युल'शी जोडलेला आहे. एनआयएने उमरची दुसरी गाडी जप्त केली असून, ती पुरावे गोळा करण्यासाठी तपासली जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणात माधव खुराना यांना विशेष लोक अभियोजक म्हणून नियुक्त केले आहे. एनआयए या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी अनेक डॉक्टरांची आणि साक्षीदारांची कसून चौकशी करत आहे.