ओवैसींना स्पीकर पदावरुन हटवलं; अखेर तेलंगणातील भाजपा आमदारांनी घेतली 'शपथ'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 08:23 AM2023-12-15T08:23:55+5:302023-12-15T08:28:51+5:30

तेलंगणाचे तिसरे विधानसभा अध्यक्ष म्हणून गद्दाम प्रसाद कुमार यांनी शपथ घेतली.

Akbaruddin Owaisi removed as Speaker; Finally BJP MLAs from Telangana took sworn of MLA | ओवैसींना स्पीकर पदावरुन हटवलं; अखेर तेलंगणातील भाजपा आमदारांनी घेतली 'शपथ'

ओवैसींना स्पीकर पदावरुन हटवलं; अखेर तेलंगणातील भाजपा आमदारांनी घेतली 'शपथ'

हैदराबाद - एमआयएमचे नेते अकबरुद्दीने ओवैसींना प्रोटेम स्पीकर पदावरुन हटवल्यानंतरच भाजपच्या नवनिर्वाचित ८ आमदारांनी विधिमंडळात शपथ घेतली. वरिष्ठ काँग्रेस नेते गद्दाम प्रसाद कुमार यांनी तेलंगणाच्या विधानसभा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतरच भाजप आमदार शपथविधीसाठी जमले. यापूर्वी प्रोटेम स्पीकर म्हणून विधानसभा अध्यक्षपदी अकबरुद्दीन ओवैसी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यास भाजप आमदारांनी विरोध दर्शवत आमदारकीची शपथ घेण्यास नकार दिला होता. 

तेलंगणाचे तिसरे विधानसभा अध्यक्ष म्हणून गद्दाम प्रसाद कुमार यांनी शपथ घेतली. तर तेलंगणा विधानसभेचे ते पहिलेच दलित स्पीकर आहेत. त्यांच्या पदभार स्वीकारल्यानंतरच, भाजप आमदार टी. राजासिंह, येलेटी महेश्वर रेड्डी, वेंकटरमण रेड्डी, पायल शंकर, पैडी राकेश रेड्डी, रामाराव पटेल पवार, धनपाल सूर्यनारायण आणि पलवई हरिश बाबू या ८ आमदारांना अध्यक्षांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. 

तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी यांनी शपथ घेतली असून काँग्रेसचं सरकार स्पष्ट बहुमताने स्थापन झालं आहे. येथील निवडणुकीत एमआयएमने ८ जागांवर विजय मिळवला असून एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी हेही पुन्हा एकदा आमदार बनले आहेत. त्यातच, अकबरुद्दीन ओवैसी यांनी प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ घेतली होती. मात्र, भाजपने त्यांच्या या शपथविधीला विरोध केला. तसेच, ९ डिसेंबर रोजी तेलंगणातील आमदारांच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कारही टाकला होता. भाजपाच्या एकाही आमदाराने ओवैसींकडून शपथ घेतली नाही. त्यानंतर, गुरुवारी नवीन अध्यक्षांच्याहस्ते त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. 

ओवैसींच्या नियुक्तीला भाजपाचा आक्षेप

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अकबरुद्दीन ओवैसींचा प्रोटेम स्पीकर म्हणून शपथविधीही झाला होता. मात्र, त्यास भाजपने विरोध केला, भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी यांनी अकबरुद्दीन ओवैसींना प्रोटेम स्पीकर बनवण्यास भाजपाचा विरोध असल्याचे म्हटले होते. तसेच, सभागृहात अनेक वरिष्ठ आमदार असताना, त्यांना बाजुला ठेऊन अकबरुद्दीन ओवैसींना प्रोटेम स्पीकर नियुक्त करणे चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हटलं. नियमित स्पीकर/ विधानसभा अध्यक्ष आल्यानंतरच आम्ही शपथ घेणार असल्याची भूमिका भाजपा आमदारांनी जाहीर केली होती. तर, राज्यपालांकडे अकबरुद्दीन ओवैसींच्या प्रोटेम स्पीकरपदाला विरोध असल्याचे पत्रही दिले होते. 
 

Web Title: Akbaruddin Owaisi removed as Speaker; Finally BJP MLAs from Telangana took sworn of MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.