"पुढच्या वेळी कुणी मुस्लीम व्यक्ती कुठे जाईल आणि म्हणेल...!"; अजमेर दर्गा वादावरून ओवेसी भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 17:44 IST2024-11-28T17:43:09+5:302024-11-28T17:44:58+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना ओवेसी म्हणाले, मोदी आणि आरएसएस यांची राजवट देशातील बंधुता आणि कायद्याचे राज्य कमकुवत करत आहे.

"पुढच्या वेळी कुणी मुस्लीम व्यक्ती कुठे जाईल आणि म्हणेल...!"; अजमेर दर्गा वादावरून ओवेसी भडकले
राजस्थानातील अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भातील वादात आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही उडी घेतली आहे. दर्गा हिंदू मंदिर असल्याचा दावा, ही भाजप आणि आरएसएसच्या द्वेषपूर्ण राजकारणाची नवी खेळी असल्याचे खासदार ओवेसी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, 'तुम्ही सगळीकडे जाऊन म्हणाल की, मशीद अथवा दर्ग्याच्या जागेवर काहीतरी वेगळे होते. पुढच्या वेळी कुणी मुस्लीम व्यक्ती कुठे जाईल आणि म्हणेल की, इथे असे काही नव्हते. हे कुठे थांबणार? कायद्याच्या राज्याचे काय होणार? लोकशाही कुठे जाणार? असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. ते 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना ओवेसी म्हणाले, मोदी आणि आरएसएस यांची राजवट देशातील बंधुता आणि कायद्याचे राज्य कमकुवत करत आहे. याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. ते पुढे म्हणाले, 'त्यांनी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला (या प्रकरणात) पक्षकार बनवले आहे. मोदी सरकार त्यांना काय सांगणार? कनिष्ठ न्यायालये प्रार्थनास्थळ कायद्यावर सुनावणी का करत नाहीत?
'नेहरूंपासून मोदींपर्यंत अजमेर दर्ग्याला चादर पाठवत आले आहेत' -
ओवेसी म्हणाले, "दर्गा गेल्या 800 वर्षांपासून आहे. नेहरूंपासून ते सर्व पंतप्रधान दर्ग्याला चादर पाठवत आले आहेत. भाजप-आरएसएसने मशिदी आणि दर्ग्यांसंदर्भात एवढा द्वेष का पसरवला आहे? पीएम मोदीही तिथे चादर पाठवतात. कनिष्ठ न्यायालये प्लेस ऑफ वर्शिप अॅक्टवर सुनावणी का करत नाहीत. अशा प्रकारे कायद्याचे राज्य आणि लोकशाही कुठे जाणार? हे देशाच्या हिताचे नाही. हे सर्व भाजप आणि आरएसएसच्या निर्देशाने होत आहे."