एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 03:28 IST2025-05-13T03:27:15+5:302025-05-13T03:28:12+5:30
पाकच्या मिराजचे तुकडे, चीनचे पीएल-१५ गारद अन् तुर्कीच्या ड्रोनलाही गाडले

एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘भय बिनु होइ न प्रीति’ असे म्हटले जाते. आमची लढाई दहशतवाद्यांविरोधात आहे, पाकिस्तानी सैन्याविरोधात नाही. मात्र, पाकिस्तान सैन्य दहशतवाद्यांना साथ देत असून, त्याला भारताने प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले, असे हवाई दलाच्या हवाई संचालन विभागाचे महासंचालक एअर मार्शल अवधेशकुमार भारती यांनी सांगितले.
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई, नौदलाचे व्हाइस ॲडमिरल ए. एन. प्रमोद व हवाई दलाचे एअर मार्शल अवधेशकुमार भारती या अधिकाऱ्यांनी सोमवारी ऑपरेशन सिंदूरशी संबंधित मुद्द्यांची माहिती दिली. भारताच्या बहुस्तरीय एअर डिफेंस यंत्रणेने पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला हवेतच परतवून लावला, असे भारती म्हणाले.
एअर मार्शल अवधेशकुमार भारती यांनी संत तुलसीदास यांच्या रामचरितमानसमधील विनय न मानत जलधि जड, गए तीनि दिन बिती, बोले राम सकोप तब, भय बिनु होइ न प्रीति अशी एक चौपाई उद्धृत केली. त्यातील भय बिनु होइ न प्रीति याचा अर्थ असा की, मनात भय वाटल्याशिवाय प्रेम किंवा सन्मान या गोष्टी मिळू शकत नाहीत. इथे भय शब्दाचा अर्थ भीती असा नसून सन्मान व शिस्तप्रिय वागणूक किंवा कारभार असा आहे. भय वाटल्याविना कोणाच्या प्रति प्रीत (सन्मान, प्रेम, स्नेह) निर्माण होणार नाही असा अर्थ तुलसीदास यांना अभिप्रेत आहे.
शस्त्रसंधीवर दोन्ही देशांच्या डीजीएमओंची चर्चा
भारत व पाकमधील शस्त्रसंधी करारातील विविध बाबींवर दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी सोमवारी चर्चा केली. डीजीएमओमध्ये दुपारी १२ वाजता हॉटलाइनद्वारे चर्चा होणार होती. मात्र त्याऐवजी संध्याकाळी पाच वाजता संवाद साधला. भारतीय लष्कराने सांगितले की, या दोन अधिकाऱ्यांमधील चर्चा पूर्ण झाली व त्याचे तपशील योग्यवेळी जाहीर करण्यात येतील.
पीएल-१५ चे काय झाले? : आकाश यंत्रणेने पाकच्या मिराज लढाऊ विमानाचे तुकडे केले. एवढेच नव्हे, तर चीननिर्मित पीएल-१५ नावाच्या हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रालाही नेस्तनाबूत केले. हीच अवस्था तुर्कीच्या ड्रोनचीही झाली.
ॲशेश टू ॲशेश, डस्ट टू...
डीजीएमओ राजीव घई यांनी विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीचाही उल्लेख केला. ते म्हणाले, ‘आपल्या अभेद्य फळीबद्दल बोलताना मी क्रिकेटमधील एक किस्सा सांगतो. आज तर आपण क्रिकेटबद्दल बोललेच पाहिजे. कोहलीने आजच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
१९७० च्या दशकात, ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमधील ॲशेस दरम्यान, दोन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी इंग्लंडची फलंदाजी उद्ध्वस्त केली व ऑस्ट्रेलियाने त्याला एक म्हण दिली, ‘ॲशेश टू ॲशेश, डस्ट टू डस्ट, इफ थॉम्मो डोन्ट गेट यू, लिलि मस्ट.’ (राख ही राखेत जाते, धूळ ही धुळीत मिसळते, थॉम्पसनला यश मिळाले नाही तरीही लिली नक्कीच यशस्वी ठरेल.) तुम्ही आपल्या सुरक्षेच्या लेव्हल पाहिल्या तर तुम्हाला मी काय म्हणतोय ते कळेल.’