"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 10:03 IST2025-10-11T10:02:12+5:302025-10-11T10:03:04+5:30
FIP नुसार, गेल्या काही दिवसांत B-787 विमानांमध्ये विविध प्रकारच्या गंभीर तांत्रिक समस्या समोर आल्या आहेत. यामुळे यामुळे प्रवाशांच्या आणि वैमानिकांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.

"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
भारतीय पायलट संघाने (Federation of Indian Pilots- FIP) नागरिक उड्डाण मंत्रालयाला (Ministry of Civil Aviation) एक पत्र लिहिले आहे. या पत्रात, तांत्रीक बिघाड आणि देखभाल दुरुस्तीशी संबंधित काही समस्यांमुळे सर्व एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणे तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात DGCA ने नुकचे विशेष ऑडिट सुरू केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
FIP नुसार, गेल्या काही दिवसांत B-787 विमानांमध्ये विविध प्रकारच्या गंभीर तांत्रिक समस्या समोर आल्या आहेत. यामुळे यामुळे प्रवाशांच्या आणि वैमानिकांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. याशिवाय, DGCA कडे भारतात सुरू असलेल्या सर्व बोइंग 787 विमानांच्या विद्युत प्रणालीची कसून तपासणी करावी.
गेल्या 4 ऑक्टोबर 2025 रोजी अमृतसर-बर्मिंगहॅम फ्लाइट AI-117 मध्ये रॅम एअर टर्बाइन (RAT) अचानक सक्रिय झाले, तर 9 ऑक्टोबरला व्हिएन्ना-नवी दिल्ली फ्लाइट AI-154 ला तांत्रिक बिघाडामुळे दुबईला डायव्हर्ट करावे लागले. या दोन्ही घटनांमध्ये ऑटोपायलट, फ्लाइट कंट्रोल सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम यांसारख्या महत्त्वाच्या यंत्रणांमध्ये बिघाड दिसला. यामुळे विमानांची स्वयंचलित लँडिंग क्षमता बाधित झाली, परिणामी हवाई सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
FIP ने सरकारचे लक्ष जूनमधील अहमदाबादमध्ये झालेल्या घटनेकडे आकर्षित केले. तसेच देशात B-787 विमानांतील तांत्रिक बिघाडांची योग्य तपासणी केली जात नाही. यामुळे हवाई सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एवढेच नाही तर, जेव्हापासून देखभालीचे काम नव्या अभियंत्यांच्या हाती आले आहे, तेव्हापासून अशा घटना वाढल्याचा दावा FIP ने केला आहे.
FIP च्या तीन मुख्य मागण्या -
- योग्य तपास : नुकत्याच झालेल्या AI-117 आणि AI-154 मध्ये झालेल्या घटनांची संपूर्ण आणि निष्पक्ष चौकशी.
- विमानांची उड्डाणं रोखणे - एअर इंडियाच्या सर्व B-787 विमानांची उड्डाणे तात्पूरती रोखावीत आणि त्यांतील विद्युत प्रणालीसह वारंवार येणणाऱ्या तांत्रिक बिघाडाचा सखोल तपास व्हावा.
- विशेष ऑडिट: तसेच DGCA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विशेष ऑडिट करावे. यात वारंवार येणाऱ्या तांत्रिक बिघाडाच्या तपासाचाही समावेश आहे.
एअर इंडियाचे निवेदन -
दरम्यान, टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने तांत्रिक बिघाडाचे दावे फेटाळून लावले आहेत. तसेच, AI-117 मध्ये 'RAT' सक्रिय होणे ही 'अनकमांड' घटना होती आणि यामुळे विमान अथवा प्रवाशांना कसल्याही प्रकारचा धोका नव्हता, असे स्पष्टीकरण दिले आहे.