Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 17:45 IST2025-07-12T17:44:19+5:302025-07-12T17:45:05+5:30
Air India Plane Crash : एअर इंडिया विमान अपघाताबाबत चौकशी अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये धक्कादायक खुलासे झाले आहेत.

Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्याविमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये २६० जणांचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी आता चौकशी अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या अहवालावर एअरलाइन पायलट्स असोसिएशनने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शनिवारी १२ जुलै २०२५ एएलपीएचे अध्यक्ष सॅम थॉमस यांनी एका निवेदनात तपासावर टीका केली. अहवालात पायलट दोषी मानल्याचा दावा त्यांनी केला.
थॉमस म्हणाले,'विमान अपघात तपास ब्युरोने वैमानिकांना अंधारात ठेवून प्राथमिक अहवाल माध्यमांसोबत शेअर केला. या तपासात पाळण्यात आलेल्या गुप्ततेमुळे आम्हाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
ALPA ने १० जुलै २०२५ रोजी वॉल स्ट्रीट जर्नलमधील एका लेखाचाही हवाला दिला, यामध्ये इंजिन इंधन नियंत्रण स्विचच्या अनवधानाने हालचालीमुळे हा अपघात झाल्याचा, दावा करण्यात आला होता.
संवेदनशील माहिती बाहेर कशी पोहोचली?
ही संवेदनशील माहिती माध्यमांपर्यंत कशी पोहोचली यावर असोसिएशनने प्रश्न उपस्थित केले. असोसिएशनने म्हटले आहे की, "कोणत्याही जबाबदार व्यक्तीच्या स्वाक्षरीशिवाय मीडियाला इतका महत्त्वाचा दस्तऐवज देण्यात आला याचे आम्हाला आश्चर्य वाटते. या गोष्टी लक्षात घेऊन, आम्ही पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना विनंती करतो की आम्हाला निरीक्षक म्हणून समाविष्ट करावे, जेणेकरून तपासात पारदर्शकता राखली जाईल."
परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगून, ALPA ने अधिकृत स्वाक्षरीशिवाय कागदपत्रे प्रसिद्ध केल्याबद्दल AAIB वर टीका केली. तसेच त्वरित सुधारणांची मागणी केली. "आम्ही सत्तेत असलेल्यांना, निरीक्षक म्हणूनही, पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सहभागी होण्याची विनंती करतो," असे असोसिएशनने म्हटले आहे.