टाटाकडे गेली तरी सुधारणा नाही...! एअर इंडियाने न्यायमूर्तींनाच दिले बुरशीयुक्त जेवण, क्रू मेंबर्सवर उद्धटपणाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 10:04 IST2026-03-18T10:02:29+5:302026-03-18T10:04:18+5:30
Air India Complaint Fungus: अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांच्या जेवणात बुरशी सापडली. लखनौत गुन्हा दाखल.

टाटाकडे गेली तरी सुधारणा नाही...! एअर इंडियाने न्यायमूर्तींनाच दिले बुरशीयुक्त जेवण, क्रू मेंबर्सवर उद्धटपणाचा आरोप
टाटा समूहाची मालकी असलेल्या एअर इंडिया विमान कंपनीच्या सेवेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दिल्लीहून लखनौकडे जाणाऱ्या विमानात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांना देण्यात आलेल्या जेवणात बुरशी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराबाबत तक्रार केली असता विमान कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
टाटा समूहाच्या एअर इंडिया विमान कंपनीच्या ढसाळ कारभाराचा फटका आता चक्क उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना बसला आहे. न्यायमूर्ती प्रशांत कुमार सोमवारी रात्री दिल्लीहून लखनौला जाणाऱ्या 'AI 1720' या विमानाने प्रवास करत होते. रात्री ९:४० वाजता हे विमान चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते. न्यायमूर्तींची जागा '१ ए' या महत्त्वाच्या रांगेत होती. प्रवासादरम्यान त्यांना जे जेवण देण्यात आले, त्यात स्पष्टपणे बुरशी दिसली.
जेव्हा न्यायमूर्तींनी या निकृष्ट अन्नावर आक्षेप घेतला, तेव्हा केबिन क्रू सदस्या मनप्रीत आणि प्रीती यांनी समस्येचे समाधान करण्याऐवजी न्यायमूर्तींशी अभद्र व्यवहार केला. इतकेच नव्हे तर, लखनौत उतरल्यानंतर कस्टमर सर्व्हिस कर्मचारी सुफियान यानेही त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
न्यायमूर्तींसोबत असलेल्या सुमित गुप्ता यांनी या संपूर्ण प्रकरणाची लेखी तक्रार स्थानिक पोलिसांत दिली आहे. "विमान कर्मचाऱ्यांनी दूषित अन्नाचा नमुना बाहेर नेण्यासही रोखण्याचा प्रयत्न केला," असे तक्रारीत नमूद केले आहे. एसीपी रजनीश वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.