"दहा वर्षांपूर्वी मुंबईच्या रस्त्यावर व्यापार करणाऱ्या छोट्या विक्रेत्याकडे साधे बँक खाते नसायचे, पण आज तोच विक्रेता मोबाईलवर एका सेकंदात डिजिटल पेमेंट स्वीकारत आहे. हा बदल विस्मयकारक आहे," अशा शब्दांत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारताच्या डिजिटल क्रांतीचे तोंडभरून कौतुक केले. राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित 'India AI Impact Summit 2026'मध्ये ते बोलत होते. या सोहळ्यात मॅक्रॉन यांनी भारताला जगातील 'एआय इंजिनिअर्सचे केंद्र' संबोधले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी केली एक कळकळीची विनंती
या जागतिक व्यासपीठावर तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर बोलताना मॅक्रॉन यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. वाढत्या सोशल मीडियाच्या धोक्यांपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक विशेष आवाहन केले. मॅक्रॉन म्हणाले, "फ्रान्समध्ये आम्ही १५ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे. आम्ही या मार्गावर पुढे गेलो आहोत आणि पंतप्रधान मोदींनीही भारतासाठी अशाच प्रकारचा विचार करावा, अशी माझी विनंती आहे." तंत्रज्ञानाचा फायदा घेतानाच भावी पिढीच्या मानसिक आरोग्याचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
'नमस्ते'ने भाषणाची सुरुवात आणि भारताचे कौतुक
आपल्या भाषणाची सुरुवात खास भारतीय शैलीत 'नमस्ते'ने करत मॅक्रॉन यांनी उपस्थितांची मने जिंकली. भारताने गेल्या दशकभरात केलेली प्रगती ही जगासाठी अभ्यासाचा विषय असल्याचे ते म्हणाले. "पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताने १४० कोटी जनतेसाठी डिजिटल ओळख निर्माण केली आहे. दरमहा २० अब्ज व्यवहार करणारी पेमेंट सिस्टीम आणि ५० कोटी डिजिटल हेल्थ आयडी ही भारताची ताकद आहे. यालाच 'इंडिया स्टॅक' म्हटले जाते आणि हे जगातील इतर कोणत्याही देशाला जमलेले नाही," असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
भारत: जगातील दुसरी सर्वात मोठी डेव्हलपर कम्युनिटी
एआयच्या भविष्यावर भाष्य करताना मॅक्रॉन यांनी भारतीय तरुणांच्या बुद्धिमत्तेवर विश्वास व्यक्त केला. भारत दरवर्षी लाखो एआय इंजिनिअर्सना प्रशिक्षित करत आहे. आज ५ लाख तज्ज्ञ अभियंत्यांसह भारत ही जगातील दुसरी सर्वात मोठी डेव्हलपर कम्युनिटी बनली आहे. त्यामुळेच भविष्यातील एआय क्रांतीचे नेतृत्व भारत करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या परिषदेला जगभरातील अनेक दिग्गज नेते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते, ज्यांनी भारताच्या वाढत्या डिजिटल प्रभावाचे स्वागत केले.
Web Summary : President Macron lauded India's digital progress at the AI Impact Summit. He urged PM Modi to consider banning social media for children under 15, citing France's policy. Macron highlighted India's digital infrastructure and growing AI engineering talent pool.
Web Summary : राष्ट्रपति मैक्रों ने एआई इम्पैक्ट समिट में भारत की डिजिटल प्रगति की सराहना की। उन्होंने पीएम मोदी से 15 वर्ष से कम उम्र के बच्चों के लिए सोशल मीडिया पर प्रतिबंध लगाने पर विचार करने का आग्रह किया, फ्रांस की नीति का हवाला दिया। मैक्रों ने भारत के डिजिटल बुनियादी ढांचे और बढ़ते एआई इंजीनियरिंग प्रतिभा पूल पर प्रकाश डाला।