Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:42 IST2025-06-18T12:38:36+5:302025-06-18T12:42:13+5:30
Ahmedabad Plane Crash Updates: अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत विमानातील प्रवाशांसह स्थानिक नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला.

Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
अहमदाबाद: १२ जून रोजी अहमदाबादमध्ये दुपारी एअर इंडियाचे एआय-१७१ विमान बी. जे. वैद्यकीय रुग्णालयाच्या वसतिगृह व अन्य इमारतींच्या संकुलावर कोसळले. त्यामुळे अतिशय घाबरलेल्या रहिवाशांनी जीव वाचविण्यासाठी पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उड्या मारण्याचा किंवा खालच्या मजल्यांवर जाण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचे हृदयद्रावक दृश्य एका व्हिडीओत पाहायला मिळते. त्या घटनेचा हा नवा व्हिडीओ आता समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे.
या व्हिडीओमध्ये दिसते की, एक महिला केवळ रेलिंगचा आधार घेत खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहे. तिला रोखण्यासाठी काही जण आराडओरडा करतानाही दिसतात.
विमान इतके जोरात कोसळले की, मेसमध्ये सर्वत्र...
विमान कोसळल्यानंतर त्याने बसलेला धक्का इतका जोरदार होता की, त्याचा मागचा भाग विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या मेस इमारतीत अडकला व विमानाचे अवशेष या संकुलात विखुरले होते, असे या दुर्घटनेच्या वेळी बचावकार्यात सहभागी झालेल्या या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
स्फोटामुळे हातातील ग्लोव्हजही वितळले
चिराग संतोक्की हे विमान अपघातस्थळी मदतकार्याकरिता सर्वांत आधी पोहोचले. त्यांनी सांगितले की, विमानात झालेल्या स्फोटाने इतकी उष्णता वाढली होती की, आम्ही हातात घातलेले ग्लोव्हजही वितळले. शरीराचे अवयव वेगळे झाले होते. अतिशय तप्त मृतदेहांवर पाणी ओतून मगच अग्निशमनच्या जवानांनी त्यांना तेथून हलविले.