अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 17:48 IST2025-07-08T17:46:51+5:302025-07-08T17:48:32+5:30
Ahmedabad plane crash: एअर इंडियाने संसदेच्या लोकलेखा समितीसमोर सांगितले की, ड्रिमलायनर हे जगातील सर्वात सुरक्षित विमानांपैकी एक आहे. तसेच सद्यस्थितीत जगभरात १ हजारांहून अधिक ड्रीमलायनर विमानं सेवेत आहेत.

अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
गेल्या महिन्यात १२ जून रोजी अहमदाबादमध्येएअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात सुमारे २७५ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, एअर इंडियाने संसदेच्या लोकलेखा समितीसमोर आपला जबाब सादर केले. या जबाबामध्ये एअर इंडियाने या अपघातातील विमान बोईंग-७८७-८ च्या दर्जाचा बचाव केला. तसेच हे जगातील सर्वात सुरक्षित विमानांपैकी एक असल्याचे सांगितले.
एअर इंडियाने संसदेच्या लोकलेखा समितीसमोर सांगितले की, ड्रिमलायनर हे जगातील सर्वात सुरक्षित विमानांपैकी एक आहे. तसेच सद्यस्थितीत जगभरात १ हजारांहून अधिक ड्रीमलायनर विमानं सेवेत आहेत. खरंतर विमानतळांवर अभिभार लावण्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र १२ जून रोजी झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही बैठक कमालीची तणावपूर्ण झाली.
१२ जून रोजी अहमदाबादमधील विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाचं लंडनला जाणारं विमान एआय-१७१ हे जवळच असलेल्या मेघानीनगरमधील बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहावर कोसळलं होतं. त्यात प्रवासी, विमानातील कर्मचारी, महाविद्यालयातील शिकाऊ डॉक्टर आणि इतर अशा मिळून सुमारे २७५ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या अपघातामुळे कंपनी खूप चिंतीत असून, याबाबतच्या अधिकृत अहवालाची वाट पाहिली जात आहे असे एअर इंडियाकडून सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.