एअर इंडियाच्या ‘त्या’ विमानात कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता तर..., इटालियन वृत्तपत्राचा सनसनाटी दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 10:36 IST2026-02-12T10:36:02+5:302026-02-12T10:36:44+5:30
Ahmedabad Air India Plane Crash: गतवर्षी जून महिन्यात अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात २४१ प्रवाशांसह एकूण २७४ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अहमदाबादमध्ये झालेल्या या विमान अपघाताबाबत इटलीमधील कोरिएरे डेला सेरा य वृत्तपत्राने सनसनाटी दावा केला आहे.

एअर इंडियाच्या ‘त्या’ विमानात कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता तर..., इटालियन वृत्तपत्राचा सनसनाटी दावा
गतवर्षी जून महिन्यात अहमदाबादमध्येएअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात २४१ प्रवाशांसह एकूण २७४ जणांचा मृत्यू झाला होता. उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच या विमानाला अपघात कसा झाला याचा तपास सध्या विविध संस्था करत आहेत. दरम्यान, अहमदाबादमध्ये झालेल्या या विमान अपघाताबाबत इटलीमधील कोरिएरे डेला सेरा य वृत्तपत्राने सनसनाटी दावा केला आहे. हा अपघात झाला तेव्हा, कॉकपिटमध्ये असलेल्या एका पायलटने इंधनाचा स्वीच जाणीवपूर्वक बंद बंद केले होते, असे भारतीय तपास संस्था आपल्या शेवटच्या अहवालात सांगू शकतात, असा दावा या वृत्तपत्राने केला आहे.
या इटालियन वृत्तपत्राने आपल्या वृत्तात म्हटले आहेत की, आतापर्यंतच्या तपासामध्ये विमानात कुठल्याही प्रकराचा तांत्रिक बिघाड असल्याचे आढळून आलेले नाही. तसेच कॉकपिट व्हाईस रेकॉर्डिंगमधून दोन पैकी एका पायलटने फ्लूएलचा स्विच बंद केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या अपघाताची जबाबदारी कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर टाकण्यात येऊ शकते, असे या इटालियन वृत्तपत्राने पाश्चात्य सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या आपल्या वृत्तात म्हटले आहे.
सर्वप्रथम डाव्या बाजूचं इंजिन बंद करण्यात आलं, अशी माहिती तपासामधून समोर आली आहे. विमानामध्ये कॅप्टन नेहमी डाव्या बाजूला बसतो, त्यामुळे संशयाची सुई सुमित सभरवाल यांच्याकडेच वळत आहे. त्यानंतर उजव्या बाजूचं इंजिन बंद झालं होतं. हे सर्व घडत असताना सहवैमानिक क्लाईव्ह कुंदर यांचा कंट्रोल स्टिक विमाना वर उडवण्याच्या स्थितीत होतं. तर कॅप्टन सभरवाल यांचं कंट्रोल स्टिक स्थिर होतं, अशीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, विमनाचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजेच ब्लॅक बॉक्समधील नोंदीमधूनही संशयाची सुई कॅप्टन सुमित सभरवाल यांच्याकडेच वळलेली आहे. ब्लॅक बॉक्सच्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही इंजिन बंद का केलं? असं एक वैमानिक दुसऱ्या वैमानिकाला विचारत असल्याचे ऐकू येत आहे. त्याला उत्तर देताना दुसरा वैमानिक मी इंजिन बंद केलेलं नाही, असे सांगत असल्याची नोंद झाली आहे, असे या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, भारतात कुठलाही मोठा वाद निर्माण होऊ नये म्हणून या अपघाताचा अंतिम अहवाल हा थोड्या सौम्य शब्दात लिहिला जाण्याची शक्यता आहे, असा दावाही या इटालियन वृत्तपत्राने केला आहे.
एअर इंडियाचं बोईंग-७८७-८ हे ड्रिमलायनर विमानाला हा अपघात गतवर्षी १२ जून रोजी झाला होता. हे विमान अहमदाबादमधून लंडनमधील गेटविक येथे जात होते. कॅप्टन सुमित सभरवाल आणि सहवैमानिक कॅप्टन क्लाइव्ह कुंदर हे या विमानाचे वैमानिक होते. या अपघातात एकूण २४१ प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता. तर विमान एका मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर आदळल्याने १९ जणांचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघातातून केवळ एक प्रवासी सहीसलामत बचावला होता.