गुजरात नगरपालिका निवडणुकीत भाजपचं 'कमळ फुललं', पण जागा घटल्या; काँग्रेसची कामगिरी सुधारली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 14:08 IST2018-02-19T13:41:30+5:302018-02-19T14:08:57+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही काँग्रेसने चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे विधानसभेनंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निकालाकडे सगळयांचे लक्ष लागले होते.

गुजरात नगरपालिका निवडणुकीत भाजपचं 'कमळ फुललं', पण जागा घटल्या; काँग्रेसची कामगिरी सुधारली!
अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही काँग्रेसने चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे विधानसभेनंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निकालाकडे सगळयांचे लक्ष लागले होते. काँग्रेसने नगरपालिका निवडणुकीतही बऱ्यापैकी जागा जिंकल्या आहेत. पण त्यांना भाजपावर मात करता आलेली नाही.
गुजरातमध्ये शनिवारी 75 नगरपालिकांसाठी मतदान झाले. सोमवार सकाळपासून मतमोजणी सुरु असून भाजपाने 44 तर काँग्रेसने 25 जागांवर विजय मिळवला आहे. सुरुवातीचे चित्र पाहिल्यास काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीचा सामना सुरु होता. पण नंतर काँग्रेस पिछाडीवर पडली. जाफराबाद नगरपालिकेत भाजपा उमेदवाराने आधीच बिनविरोध विजय मिळवला आहे.
वलसाडच्या धरमपूरमध्ये भाजपाने 14 नगरपालिकांमध्ये विजय मिळवला तेच काँग्रेसला 10 जागांवर समाधान मानावे लागले. वलसाडच्या पार्डीमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना झाला. दोघांनी प्रत्येकी 14-14 नगपालिकांमध्ये विजय मिळवला. नवसारीच्या बिलीमोरामध्ये भाजपाने 21 नगरपालिका जिंकल्या. तिथे काँग्रेसला तीन आणि अपक्षांना 13 जागा मिळाल्या. भाजपाने दक्षिण गुजरातमध्ये सर्वच जागांवर विजय मिळवला.
पार्डी आणि वलसाडमध्ये दोन्ही पक्षांमध्ये सामना बरोबरीत सुटला. सोनगडमध्ये भाजपाने 21 आणि काँग्रेसने सात जागा जिंकल्या. 2013 सालच्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाने 60 जागा जिंकल्या होत्या. त्यातुलनेत भाजपाच्या जागा यावेळी कमी झाल्या. काँग्रेसच्या जागा वाढल्या. गुजरातच्या 28 जिल्ह्यातील 75 जागांसाठी शनिवारी मतदान झाले होते. एकूण 64.4 टक्के मतदान झाले. डिसेंबरमध्येच गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निम शहरी आणि निम ग्रामीण पट्टयात या निवडणुका झाल्या.