महाराष्ट्र आणि दिल्ली जिंकल्यानंतर आता 'या' राज्यांवर भाजपची नजर; पंतप्रधान मोदी या ठिकाणावरून वाजवणार बिगुल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 19:19 IST2025-02-19T19:19:03+5:302025-02-19T19:19:42+5:30
याच वर्षात ऑक्टोबरपर्यंत बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दृष्टीने भाजप आतापासूनच सक्रीय दिसत आहे.

महाराष्ट्र आणि दिल्ली जिंकल्यानंतर आता 'या' राज्यांवर भाजपची नजर; पंतप्रधान मोदी या ठिकाणावरून वाजवणार बिगुल
भाजपने जवळजवळ तीन दशकांनंतर दिल्लीच्या सत्तेत जोरदार पुनरागमन केले आहे. मात्र, या विजयाच्या आनंदा बरोबर भाजप पुन्हा एकदा पुढच्या निवडणुकीची तयारीलाही लागला आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णपणे सक्रिय दिसत आहेत. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बिहार, आसाम आणि तामिळनाडूसारख्या राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
याच वर्षात ऑक्टोबरपर्यंत बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दृष्टीने भाजप आतापासूनच सक्रीय दिसत आहे. बिहारमधील आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी, पंतप्रधान मोदी २४ फेब्रुवारी रोजी भागलपूर येथून निवडणूक प्रचाराचा बिगुल वाजवणार आहेत. महत्वाचे म्हणजे, भागलपूरमध्ये याची तयारीही सुरू झाली आहे.
तसेच, आसाम आणि तामिळनाडूमध्ये पुढील वर्षात निवडणुका हणार असल्या तरी, पंतप्रधान मोदी मात्र आतापासूनच तयारीत आहेत. भागलपूरमधील निवडणूक रॅलीनंतर, ते २४ फेब्रुवारीला आसाममध्येही जाणार आहेत. ते तेथे एका जनसभेला संबोधित करतील. यानंतर, ते २८ फेब्रुवारी रोजी तामिळनाडूला जात आहेत. ते तेथे रामेश्वरमला तामिळनाडूशी जोडणाऱ्या पांबन पुलाचेही उद्घाटन करतील.
नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी स्वतःच निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले होते. यामुळे, येत्या निवडणुकांतही पंतप्रधान मोदी यांच्याच नेतृत्वात होतील असे मानले जात आहे. बिहारमध्ये भाजपची नितीश कुमारांच्या जदयूसोबत युती आहे. भागलपूरमध्ये पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार एकत्रितपणे व्यासपीठावर असतील. याशिवाय, भाजप गेल्या १० वर्षांपासून आसाममध्ये सत्तेवर आहे. यामुळे पुन्हा तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दबाव त्यांच्यावर असेल. तसेच, भागलपूरच्या अनेक जागांवर भाजप कमकुवत मानला जातो. अशा स्थितीत, पंतप्रधान मोदींनी येथून रॅली करणे महत्त्वाचे मानले जाते.