‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 08:06 IST2025-09-26T08:03:03+5:302025-09-26T08:06:30+5:30
केंद्राने वांगचूक यांच्या एनजीओचा परवाना केला रद्द, लडाख हिंसाचारानंतर ५० जण अटकेत; ८० जखमी

‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
सुरेश एस. डुग्गर
जम्मू - लडाखला राज्याचा दर्जा द्यावा आणि राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचित समावेश या मागणीसाठी सुरू झालेले आंदोलन हिंसक वळणावर गेल्याने बुधवारी किमान चारजणांचा मृत्यू झाला, तर ८०हून अधिक जण जखमी झाले. प्रशासनाने याप्रकरणी ५०हून अधिक जणांना अटक करून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. लेहमध्ये कर्फ्यू, तर करगिलमध्ये कलम १६३ लागू करण्यात आले आहे. दरम्यान केंद्र सरकारने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या एनजीओचा परवाना रद्द केला आहे.
लेह शहरात कालच्या हिंसक आंदोलनानंतर शांतता असल्याचा दावा प्रशासनाने केला. मात्र पुढील तणाव टाळण्यासाठी तेथे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, वाढत्या असंतोषावर तोडगा काढण्यासाठी केंद्राने तातडीने संवाद सुरू करावा, असे आवाहन स्थानिक नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले.
नायब राज्यपाल म्हणाले...
नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी हिंसाचाराचा निषेध केला. पीडित कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त करताना त्यांनी हा प्रकार लडाखच्या परंपरांना हरताळ फासणारा असल्याचे सांगितले.
काही आर्थिक व्यवहार राष्ट्रीय हिताविरुद्ध आढळले
सोनम वांगचूक यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख (एसईसीओमओएल) या संस्थेचा ‘एफसीआरए’ परवाना केंद्र सरकारने रद्द केला आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, संस्थेच्या हिशेबात आढळलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, स्वीडनमधून आलेल्या निधीसह काही आर्थिक व्यवहार ‘राष्ट्रीय हिताविरुद्ध’ असल्याचे आढळले. त्यामुळे संस्थेला मिळालेला परदेशी निधी स्वीकारण्याचा परवाना रद्द करण्यात आला. सरकारने या हिंसाचाराला वांगचूक यांच्या ‘प्रक्षोभक वक्तव्यांना’ जबाबदार धरले आहे.
‘मला तुरुंगात टाकले तर सरकारसाठी आणखी अडचणी निर्माण होतील
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी सरकार मला बळीचा बकरा बनवत असल्याचा आरोप केला आहे. वांगचूक म्हणाले की, सरकार मला दोन वर्षांसाठी तुरुंगात टाकण्याचा कट रचत आहे. मी त्यासाठी तयार आहे. पण तुरुंगातील सोनम वांगचूक हा मोकळ्या वांगचूकपेक्षा सरकारसाठी अधिक अडचणी निर्माण करेल. माझ्या किंवा काँग्रेसमुळे हिंसाचार झाला असे म्हणणे म्हणजे मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे. बेरोजगारीमुळे आणि अपूर्ण आश्वासनांमुळे युवकांमध्ये प्रचंड निराशा आहे, असे ते म्हणाले.
लोकांना छळू नका
लेहमधील जाळपोळीच्या निष्पक्ष चौकशीची मागणी कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सने गुरुवारी केली. प्रशासनाने लोकांना छळण्याचे प्रकार तातडीने थांबवावेत, असेही संघटनेचे नेते असगर अली करबलई म्हणाले. सरकारने हिंसाचाराचे खापर सोनम वांगचूक यांच्यावर फोडले. मात्र, केडीएने हा आरोप फेटाळला. हिंसाचारात मृत्यू झालेले चारही जण ‘लडाखचे वीर’ असल्याचे त्यांनी म्हटले.