१० मुलींच्या जन्मानंतर ११वा मुलगा झाला! जन्मदाता पिता मात्र बेरोजगार; मनातील भावना सांगताना म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 11:27 IST2026-01-08T11:25:58+5:302026-01-08T11:27:24+5:30
१० मुलांच्या जन्मानंतर सुनीता यांची ही ११ वी प्रसूती होती, त्यामुळे हे प्रकरण वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचे आणि 'हाय रिस्क' होते.

१० मुलींच्या जन्मानंतर ११वा मुलगा झाला! जन्मदाता पिता मात्र बेरोजगार; मनातील भावना सांगताना म्हणाले..
हरियाणाच्या जींद जिल्ह्यातून एक अत्यंत विस्मयकारक घटना समोर आली आहे. सगळ्यांमध्येच या घटनेची चर्चा सुरू आहे. तब्बल १० मुलींच्या जन्मानंतर एका कुटुंबात अखेर मुलाचा जन्म झाला आहे. लग्नाच्या १९ वर्षांनंतर आणि ११ व्या प्रसूतीनंतर मुलगा झाल्याने हे कुटुंब सध्या आनंदी असले, तरी या घटनेने 'पुत्रप्राप्ती'च्या हट्टापायी होणाऱ्या लोकसंख्यावाढीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
डॉक्टरांसमोर मोठे आव्हान, पण सुखरूप प्रसूती
३७ वर्षीय सुनीता यांना जींदच्या उचाना येथील ओजस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १० मुलांच्या जन्मानंतर सुनीता यांची ही ११ वी प्रसूती होती, त्यामुळे हे प्रकरण वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचे आणि 'हाय रिस्क' होते. प्रसूतीतज्ज्ञ डॉ. संतोष आणि डॉ. नरवीर श्योराण यांनी सांगितले की, सुनीता यांच्या शरीरात रक्ताची मोठी कमतरता होती. त्यांना तीन युनिट रक्त द्यावे लागले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि सुनीता यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला.
बेरोजगारीचं संकट, तरीही मुलाचा आनंद
मुलाचे वडील संजय यांची आर्थिक परिस्थिती सध्या बेताची आहे. एकेकाळी पीडब्ल्यूडीमध्ये रोजंदारीवर काम करणारे संजय २०१८ पासून बेरोजगार आहेत. मनरेगामध्येही वर्षभरापासून काम मिळालेले नाही. आज त्यांच्यावर ९ मुली (एक मुलगी दत्तक दिली आहे), नवजात मुलगा, पत्नी आणि वृद्ध आई अशा मोठ्या कुटुंबाची जबाबदारी आहे. संजय म्हणतात, "काम असो वा नसो, मुलांचे पोट तर भरावेच लागते. लोक टोमणे मारायचे की इतक्या मुली कशा सांभाळणार? पण मी कधीच मुलींना ओझं मानलं नाही. जे झालं ती देवाची इच्छा होती. माझ्या मुलींचीही इच्छा होती की त्यांना एक भाऊ मिळावा, ती आज पूर्ण झाली."
स्वतःच्याच मुलींची नावे विसरले!
सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये संजय यांना त्यांच्या १० मुलींची नावे विचारण्यात आली. गमतीची गोष्ट म्हणजे, स्वतःच्या लेकींची नावे सांगताना संजय यांची चांगलीच तारांबळ उडाली आणि ते नावे विसरले. मात्र, आपल्या सर्व मुली शाळेत जात असून मोठी मुलगी १२ वीत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
आनंद की सामाजिक शोकांतिका?
संजय यांची आई माया देवी नातवाच्या जन्माने हरखून गेल्या आहेत. "देवाने आमचं साकडं ऐकलं," अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, हरियाणासारख्या राज्यात जिथे लिंगगुणोत्तर सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, तिथे एका मुलाच्या हव्यासापोटी ११ अपत्यांना जन्म देणे, ही जुनाट मानसिकतेची लक्षणं असल्याचेही बोलले जात आहे. सोशल मीडियावर यावर संमिश्र प्रतिक्रिया येत असून, काहींनी संजय यांच्या संघर्षाचे कौतुक केले आहे, तर काहींनी वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे. संजय मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. "मुली आज प्रत्येक क्षेत्रात नाव कमवत आहेत, मी त्यांना कधीच कमी मानले नाही. फक्त कुटुंबाची एक इच्छा होती, ती आज पूर्ण झाली," असे ते साधेपणाने सांगतात.