मेघालयातील अधिकाऱ्यांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करत, पूर्व खासी पर्वतीय जिल्ह्यांच्या बाहेरील भागांसाठी गाइड ठेवणे अनिवार्य केले आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सोमवारी माहिती दिली. महत्वाचे म्हणजे, इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशीच्या हत्येच्या साधारणपणे एक महिन्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे. हा हत्येचा कट राजाच्या पत्नीने राज्यातील सोहरा भागात आपल्या हनिमून दरम्यान आखला होता. पूर्व खासी हिल्स जिल्ह्याच्या उपायुक्त रोसेटा एम कुर्बाह यांनी आदेशात म्हटले आहे की, "सुरक्षेच्या कारणास्तव, आता सर्व पर्यटकांना परिसरात गिर्यारोहण करताना नोंदणीकृत गाईडची सेवा घेणे अनिवार्य आहे."
एम कुर्बाह म्हणाल्या, "अनिवार्य गाईड सेवेमुळे केवळ पर्यटकांची सुरक्षितताच सुनिश्चित होणार नाही, तर दुर्गम भागात हरवणे, जखमी होणे अथवा गुन्हेगारी कारवायांना बळी पडणे, आदी घटनांही टाळण्यास मदत होईल. कुर्बाह या जिल्हा पर्यटन प्रमोशन सोसायटीच्या अध्यक्ष देखील आहेत. दरम्यान राजा रघुवंशी हत्याकांडाची अजूनही संपूर्ण देशभरात चर्चा होत आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशातील इंदूर येथून आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
आदेशाचे काटेकोर पालन करावे लागेल -यासंदर्भात बोलताना, पर्यटन अधिकारी म्हणाले, या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. उल्लंघन करणाऱ्यांना दंड भरावा लागू शकतो अथवा त्यांना विविध मार्गांवर जाण्यापासून रोखले जाऊ शकते. प्रशासनाने या निर्देशाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी, अधिक प्रशिक्षित गाईड तैनात करण्याची आणि स्थानिक लोकांच्या साथीने काम करण्याची योजना आखली आहे.