उत्तर भारताला हुडहुडी भरली, बद्रीनाथमध्ये बर्फवृष्टी सुरू; मध्य प्रदेशात कडाक्याच्या थंडीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 09:59 IST2025-11-23T09:59:23+5:302025-11-23T09:59:52+5:30
मध्य प्रदेशात थंडीने दोघांचा मृत्यू, केदारनाथचे तपमान उणे १२ अंश

उत्तर भारताला हुडहुडी भरली, बद्रीनाथमध्ये बर्फवृष्टी सुरू; मध्य प्रदेशात कडाक्याच्या थंडीचा इशारा
नवी दिल्ली : उत्तर भारतात काही ठिकाणी झालेल्या बर्फवृष्टीनंतर अनेक राज्यांत थंडीने हुडहुडी भरली आहे. बद्रीनाथमध्ये बर्फवृष्टी झाली तर, मध्य प्रदेशात थंडीमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात गत दोन दिवसांत थंडीमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी भोपाळ, इंदूरसह सात जिल्ह्यांत थंडीची लाट आली. पंचमढीत यंदा प्रथमच तापमान ५.८ अंश सेल्सिअस इतके कमी नोंदविले गेले.
उत्तराखंडमध्ये कडाक्याची थंडी असून, चमोली जिल्ह्यात शेषनेत्र तलाव गोठला आहे. बद्रीनाथ धाममध्ये नोव्हेंबरमधील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. छत्तीसगडमध्ये आगामी तीन दिवस तापमान २ ते ३ अंश सेल्सिअस वाढेल, असा अंदाज आहे. हिमाचलमध्ये दहा शहरांत तापमान ५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. तर, तीन ठिकाणी तापमान शून्याच्या खाली नोंदविले गेले. हरयाणात काही भागात शनिवारी धुके पडले होते. रात्रीचे तापमान ८ ते १० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. आगामी तीन दिवस थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राजस्थानात आठवड्यानंतर तापमानात किंचित वाढ झाली आहे. किमान तापमान १ अंशाने वाढले.
मध्य प्रदेशात इशारा
मध्य प्रदेशात गेल्या १५ दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. गेल्या २४ तासांत भोपाळ आणि इंदूरसह सात जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आली. नरसिंहपूरमध्ये दिवसभर थंडी होती. रात्रीही अनेक शहरांमध्ये पारा घसरला. भोपाळ आणि इंदूरसह सात जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. तथापि, उद्यापासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दिल्ली एनसीआरमध्ये थंडीचा कडाका होता. दुसरीकडे हवेची गुणवत्ता सातत्याने खराब होत आहे.
...तरीही पर्यटकांची गर्दी
चमोली जिल्ह्यातील शेषनेत्र तलावही गोठला आहे. १४,५०० फूट उंचीवर असलेल्या पिथोरागडच्या आदि कैलास भागातही बर्फवृष्टी झाली आहे. परिणामी, परिसरातील सर्व तलाव गोठले आहेत. या परिसराचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकही येत आहेत. उत्तराखंडमध्ये सकाळ आणि संध्याकाळचे तापमान वाढत असताना, मैदानी भागात धुके जमू लागले आहे. केदारनाथमध्ये उणे १२ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नोंदवले गेले. शिवाय, उंचावरील भागात ढगाळ वातावरण आहे.