सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 05:56 IST2025-04-25T05:55:58+5:302025-04-25T05:56:54+5:30
नरसंहारानंतर केंद्राचा लष्कराला सज्ज राहण्याचा आदेश; क्षेपणास्त्रांचा पाकवर मारा करण्याचा पर्याय’

सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
सुरेश एस. डुग्गर
जम्मू : पुलवामा येथे झालेला हल्ला तसेच पहलगाममध्ये घडलेल्या नरसंहारानंतर भारतपाकिस्तानविरोधात युद्ध पुकारणार का, असा प्रश्न असंख्य लोकांना पडला आहे. मात्र, सीमेवर संपूर्ण युद्ध न होता कारगिलसारखी लघु युद्धे दोन्ही देशांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय लष्करालाही अतिशय सतर्क राहण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला असून, ही काही गोष्टींची पूर्वतयारी असू शकते असेही म्हटले जाते.
२०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीतील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला होता. लष्करातील एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, लष्कर प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज होत आहे. मात्र, या कारवाईचे स्वरूप काय असेल याबद्दल त्याने माहिती दिली नाही. यापूर्वी उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट एअर स्ट्राइकची जबाबदारीही उत्तर कमांडने यशस्वीपणे पार पाडली होती. भारतीय लष्कर पाकिस्तानला शिक्षा देण्यासाठी विविध गोष्टींचा विचार करत आहे. पाकिस्तानच्या हालचालींचं उत्तर फक्त राजनैतिक नव्हे तर लष्करी स्तरावरही देण्याची तयारी भारताने सुरू केली आहे.
दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी हे चार पर्याय
काश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे नष्ट करण्यासाठी चार प्रमुख पर्याय भारतीय लष्कराने केंद्र सरकारला सुचविले. त्यातील एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे ब्रह्मोस, पृथ्वी क्षेपणास्त्रांसारख्या जमिनीवरून जमिनीवर मारा करता येणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर करावा. पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे या क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त करता येतील. उर्वरित तीन पर्यायही विचाराधीन असून, त्यापैकी एक म्हणजे भारतीय लष्कराला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे.
म्हणजे लष्कर सर्जिकल स्ट्राइकसारखी कारवाई करून, एलओसी पार करून दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त करून माघारी येईल.
मोर्टार आणि बोफोर्स तोफा वापरू द्या : लष्कर
भारतीय लष्कराने केंद्राला सुचविलेला दुसरा पर्याय म्हणजे बोफोर्स तोफांचा मुक्त वापर करण्याची परवानगी देणे. यामध्ये एलओसीपासून १८ ते २० किमी अंतरावर असलेल्या काही केंद्रांवर मोर्टार आणि बोफोर्स तोफा वापरून हल्ला केला जाईल. बोफोर्स तोफा डोंगराळ भागात २८ ते ३० किमी अंतरावर मारा करू शकतात आणि एलओसीवर या तोफा पुन्हा तैनात करण्यात आल्या आहेत. तिसरा पर्याय म्हणजे भारतीय वायुसेना आणि ड्रोन हल्ल्यांचा वापर करून प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त करणे. यामध्ये राफेल, मिराज-२००० आणि सुखोई विमाने वापरण्याचा प्रस्ताव आहे, कारण ही विमाने अचूक लक्ष्यभेद करण्यास सक्षम आहेत.