Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 10:32 IST2025-05-02T10:30:41+5:302025-05-02T10:32:05+5:30
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसह विविध देशांमधील हॅकिंग गँगकडून भारतीय सिस्टमवर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले करण्यात आले आहेत.

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसह विविध देशांमधील हॅकिंग गँगकडून भारतीय सिस्टमवर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. २२ एप्रिल रोजी काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेच्या सायबर विभागाने डिजिटल हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले झाले. भारतीय वेबसाइट्स आणि पोर्टल्सना टार्गेट करणारे हे हल्ले पाकिस्तान, मध्य पूर्व, इंडोनेशिया आणि मोरोक्को येथून करण्यात आले.
अनेक हॅकिंग गटांनी इस्लामी गट असल्याचा दावा केला आहे. हे कदाचित एक सायबर युद्ध असू शकतं. यातील अनेक हल्ले महाराष्ट्र सायबरने हाणून पाडले अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नोडल कार्यालयाने सर्व सरकारी विभागांसाठी एक सल्लागार तयार केला आहे, ज्यामध्ये त्यांना त्यांची सायबर पायाभूत सुविधा मजबूत करण्यास सांगितली आहे. २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगामजवळील बैसरन येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेक जण जखमी झाले. धर्म विचारून पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. पहलगाममधील या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे.