पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (२१ जुलै २०२५) कोलकाता येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाषिक असहिष्णुतेसंदर्भात तीव्र शब्दांत आवाज उठवला. बंगाली भाषेत बोलणे गुन्हा आहे का? का थांबवले जाते? का थांबवले जाते? असा सवालही त्यांनी केला. महत्वाचे म्हणजे, देशभरात भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण पेटलेले असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे हे विधान आले आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "जर बिहारप्रमाणे बंगालमध्ये बंगाली भाषेला दाबण्याचा प्रयत्न झाला तर तृणमूल काँग्रेस याचा तीव्र विरोध करेल. एवढेच नाही तर, "आम्ही घेराव घालू, मते कापू देणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी पश्चिम बंगालच्या सांस्कृतिक वारशाचाही उल्लेख त्यांनी केला.
सांगितला बंगालचा सांस्कृतिक वारसा - बंगालच्या सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करत ममता पुढे म्हणाल्या, "बंगालच्या भूमीने रवींद्रनाथ टागोरांना जन्म दिला. 'जन गण मन' आणि 'वंदे मातरम' सारखी राष्ट्रीय गीतही येथूनच आले." तसेच आपण, हिंदी, गुजराती, मराठी अशा सर्वच भारतीय भाषांचा आदर करतो, मात्र बंगाली भाषेचा द्वेष अथवा ती बोलण्यापासून रोखणे मान्य नाही," असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
यावेळी मुख्यमंत्री ममता यांनी स्वातंत्र्यलढ्यातील बंगालच्या भूमिकेची आठवण करून दिली, त्या म्हणाल्या, "स्वातंत्र्यलढ्यात बंगालीने भाग घेतला होता. आमची भाषा आमची ओळख आहे आणि ती दाबण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही."