किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 10:57 IST2025-08-17T10:57:18+5:302025-08-17T10:57:46+5:30
जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप झाला आहे. किश्तवाडनंतर कठुआमध्येही ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप झाला आहे. किश्तवाडनंतर कठुआमध्येही ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जोध व्हॅली, चंद्रा भेद बलोर, बागरा जंगलोट आणि दिलवान हातली लखनपूरसह जिल्ह्यातील अनेक भागात ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या आपत्तीत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर स्थानिक प्रशासन आणि मदत-बचाव पथकांनी सहा जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.
कठुआच्या राजबाग भागातील जोध गावात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या ठिकाणी झालेल्या ढगफुटीनंतर पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मते, अचानक पाण्याचा पूर आला, ज्यामुळे लोकांना सावरण्याची संधी मिळाली नाही. एसडीआरएफ आणि पोलीस पथके मदत आणि बचाव कार्यात सतत गुंतलेली आहेत. स्थानिक प्रशासनाने म्हटले की, लोकांना सुखरूप ठेवण्याला प्राधान्य द्यायचे आहे.
वीजपुरवठा खंडित
कठुआ जिल्ह्यातील या दुर्गम आणि डोंगराळ भागात ढगफुटी झाल्यामुळे नद्या आणि ओढ्यांमधील पाण्याची पातळी अचानक वाढली आहे. त्यामुळे अनेक रस्ते तुटले आहेत आणि गावांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही बंद झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने इशारा जारी केला आहे आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.
#KNSUPDATE || Cloudburst hits Kathua's village; Four dead, several injured pic.twitter.com/ZVxkE2asRe
— KNS (@KNSKashmir) August 17, 2025
या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, याआधीही पावसामुळे समस्या निर्माण झाल्या होत्या, परंतु पहिल्यांदाच त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अनेक कुटुंबे आपली घरे सोडून उंच भागात स्थलांतरित झाली आहेत.
प्रशासनाने माहिती देताना सांगितले की, या आपत्तीत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच, या घटनेत रेल्वे ट्रॅक आणि राष्ट्रीय महामार्गाचे नुकसान झाले आहे, तर कठुआ पोलीस स्टेशनलाही याचा फटका बसला आहे. डॉ. सिंह म्हणाले की, नागरी प्रशासन, लष्कर आणि निमलष्करी दलांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.