पूर ओसरताच नदी किनारी आढळला चांदीच्या नाण्यांचा खजिना; गोळा करायला अख्खा गाव लोटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 14:18 IST2021-08-09T14:17:59+5:302021-08-09T14:18:17+5:30
नदीला आलेला पूस ओसरताच ग्रामस्थांनी किनाऱ्यावर सापडली चांदीची नाणी; ब्रिटिशकालीन नाणी असल्याचा दावा

पूर ओसरताच नदी किनारी आढळला चांदीच्या नाण्यांचा खजिना; गोळा करायला अख्खा गाव लोटला
मध्य प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आहे. याचा फटका हजारो नागरिकांना बसला आहे. पुराचा पाणी ओसरलेल्या भागातील नागरिक पुन्हा एकदा आपलं घर सावरत आहेत. याच दरम्यान अशोक नगरच्या पंचावली गावात एक वेगळीच घटना घडली आहे. या घटनेची सध्या पंचक्रोशीत चर्चा आहे. मुसळधार पावसामुळे सिंध नदीला पूर आला. रविवारी सकाळच्या सुमारास पूर ओसरला. त्यावेळी काही ग्रामस्थ नदीच्या तीरावर गेले होते. तिथे त्यांना चांदीची नाणी आढळून आली. या घटनेची माहिती वाऱ्याच्या वेगानं गावात पसरली आणि नदी किनारी एकच झुंबड उडाली.
सिंध नदीला आलेला पूर ओसरल्यानंतर काही जण नदीच्या तीरावर गेले होते. त्यावेळी त्यांना चांदीची नाणी आढळली. घटनेची माहिती पसरताच अनेकांनी नदीच्या काठावर धाव घेतली. ही नाणी अतिशय खास दिसत आहेत. ती ब्रिटिशकालीन असल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या छपाईवरून ही बाब समोर आली आहे.
नदी किनाऱ्यावर गेलेल्या ग्रामस्थांना सुरुवातीला एक-दोन नाणी दिसली. त्यानंतर शोधाशोध केली असता, आणखी सात-आठ नाणी सापडली. चांदीच्या नाण्यांचा खजिना वाहून आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नाणी गोळा करायला संपूर्ण गाव नदी किनारी लोटला. एखाद्यानं त्याच्या घरात चांदीची नाणी लपवली असावीत आणि पुरामुळे ती वाहून आली असावीत असा काही ग्रामस्थांचा अंदाज आहे.