साडी नेसतोय... लिपस्टिकही लावतोय..., इंजिनिअर पतीचे 'विचित्र' प्रकरण पोहोचले कोर्टात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 12:47 IST2025-01-10T12:46:48+5:302025-01-10T12:47:22+5:30
पत्नीने त्याला समजावण्याचा वारंवार प्रयत्न करूनही काहीही निष्पन्न झाले नाही.

साडी नेसतोय... लिपस्टिकही लावतोय..., इंजिनिअर पतीचे 'विचित्र' प्रकरण पोहोचले कोर्टात!
मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या एका व्यक्तीने लग्नाच्या ८ वर्षांनंतर महिलेसारखे कपडे परिधान करण्यात सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर त्याने ओठांवर लिपस्टिक लावायला सुरुवात केली आहे. याला पत्नीचा विरोध असूनही त्याने असे करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, त्याने आधार कार्डमध्येही आपले नाव बदलले आहे. अखेर या सगळ्याला कंटाळून पत्नीने त्याच्याकडून घटस्फोट मागितला आहे. याप्रकरणी कुटुंब न्यायालयातघटस्फोटाची याचिका दाखल करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, याचिका दाखल करणाऱ्या महिलेच्या वकिलाने सांगितले की, दोघांचेही लग्न २०१३ मध्ये झाले होते. इंजिनिअर एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो. लग्नाच्या जवळपास चार वर्षांनंतर, २०१७ मध्ये एका मुलाचा जन्म झाला. त्यानंतर २०२१ पर्यंत दोघांचेही वैवाहिक जीवन चांगले चालले होते. २०२१ मध्ये कंपनीच्या कामामुळे इंजिनिअर पतीला बंगळुरूला जावे लागले. बंगळुरूवरून परत येताच त्याचे वर्तन पूर्णपणे बदलले. तो आपल्या पत्नीची साडी नेसू लागला.
सुरुवातीला इंजिनिअरच्या पत्नीला वाटले की, तिचा पती मस्करी करत आहे. पण तो दररोज साडी नेसू लागला. साडी नेसण्यामागचे कारण विचारले असता, त्याने सांगितले की, दररोज साडी परिधान करणार असून मला स्त्री व्हायचे आहे. यावेळी पत्नीने त्याला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तो तिचे ऐकायला तयार नव्हता. त्याने स्त्री होण्यासाठी स्वतःवर उपचार करायला सुरुवात केली. याचबरोबर, या पतीने आपल्या पत्नीला १८ लाख रुपयेही दिले आणि स्वतः बंगळुरूमध्ये राहायला गेला.
यादरम्यान, घर चालवण्यासाठी इंजिनिअरच्या पत्नीने एका खाजगी कंपनीत काम करायला सुरुवात केली आहे. हे दोघेही २०२१ पासून वेगळे राहत आहेत. स्त्री होण्यासाठी इंजिनिअर पतीने आपले आधार कार्डमध्येही नाव बदलले आहे. तसेच, तो स्त्री होण्यासाठी औषधही घेत आहे. लवकरच तो शस्त्रक्रिया देखील करणार आहे. एवढेच नाही तर त्याने आपल्या कुटुंबाला असेही सांगितले की, त्याला पुरुष नाही तर एक स्त्री म्हटले पाहिजे. त्याच्या पत्नीने त्याला समजावण्याचा वारंवार प्रयत्न करूनही काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर पत्नीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आता घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.