दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 20:22 IST2025-11-06T20:21:57+5:302025-11-06T20:22:28+5:30
माजी राज्यसभा खासदार राकेश कुमार सिन्हा यांनी आज ६ नोव्हेंबर २०२५ रोजी मतदान केल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट केली.

दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
पटना - मतदार यादीत अनेक दुबार मतदार असून निवडणूक आयोगाकडून जाणुनबुजून याकडे दुर्लक्ष केले जाते असा आरोप सातत्याने विरोधी पक्ष करत आहे. मात्र पराभवाला कारण म्हणून विरोधक हे आरोप करतायेत असा दावा भाजपाकडून करण्यात येतो. त्यातच आता राज्यसभेचे भाजपाचे माजी खासदार राकेश कुमार सिन्हा यांनी दिल्लीनंतर आता बिहार निवडणुकीत दुसऱ्यांदा मतदान केल्याचा आरोप आहे. राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने यावरून निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
राकेश सिन्हा बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यात राहणारे आहेत. विरोधक दुबार मतदारावरून देशभरात रान उठवत असताना भाजपा नेत्याने १० महिन्यात २ राज्यात मतदान केल्याने खळबळ माजली आहे. त्यावर माझे वडिलोपार्जित घर बेगुसराय येथे आहे. मी जमिनीशी नाळ तोडलेला माणूस नाही असं सिन्हा यांनी म्हटलं आहे. बिहारच्या राजकारणात सक्रियतेमुळे मी माझे नाव मनसेरपूर येथे नोंदवले होते असं त्यांनी स्पष्टीकरण दिले.
काय आहे वाद?
माजी राज्यसभा खासदार राकेश कुमार सिन्हा यांनी आज ६ नोव्हेंबर २०२५ रोजी मतदान केल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट केली. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, मी माझ्या वडिलोपार्जित गाव मनसेरपूर (बेगुसराय) येथे मतदान केले. हे गाव साहेबपूर कमाल विधानसभा मतदारसंघात येते. मात्र याच फोटोवरून वादंग निर्माण झाला. राष्ट्रीय जनता दलाने या मतदारसंघातून सतानंद संबुद्धा यांना उमेदवारी दिली आहे. एनडीएने ही जागा चिराग पासवान यांच्या पक्षाला दिली आहे. एलजेपी (आर) ने या मतदारसंघातून सुरेंद्र कुमार यांना उमेदवारी दिली आहे.
राकेश कुमार सिन्हा यांच्या या पोस्टमुळे काही युजरने त्यांच्या जुन्या पोस्टचा उल्लेख केला तेव्हा वाद निर्माण झाला. या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली विधानसभा निवडणूक काळात राकेश कुमार सिन्हा यांनीही द्वारका मतदारसंघात मतदान केले होते. राकेश सिन्हा यांची पोस्ट सोशल मीडियावर येताच विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनाते यांनी त्यांना जाब विचारला. राकेश सिन्हा यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदान केले. त्यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीतही मतदान केले. हे कोणत्या योजनेअंतर्गत घडत आहे, भाऊ? असं त्यांनी खोचक प्रश्न केला.

तसेच दिल्ली आपचे प्रमुख सौरभ भारद्वाज यांनीही राकेश सिन्हा वादावर भाष्य केले. भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार आणि सर्वांना मूल्ये शिकवणारे आरएसएस विचारवंत राकेश सिन्हा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदान केले आणि आज बिहार निवडणुकीतही मतदान केले. सिन्हा दिल्ली विद्यापीठाच्या मोतीलाल नेहरू कॉलेजमध्ये शिकवतात, म्हणून ते बिहारचा पत्ताही दाखवू शकत नाहीत. जर यातून भाजपा सरकारची चोरी पकडली तर ते सुधारतील? अजिबात नाही ते उघडपणे चोरी करतील असा टोला लगावला आहे.
baseless and morally contested allegation is being levelled against me by by liars and morally degraded leaders of @AamAadmiParty@INCIndia and their ilks . My name is only in Bihar’s electoral roll . It was earlier in Delhi’ s electoral roll and I got it deleted through… pic.twitter.com/wuvwHPZD8V
— Prof Rakesh Sinha (@RakeshSinha01) November 6, 2025
नियम काय सांगतो?
लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मध्ये मतदार यादींबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यात कलम १७ मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, कोणताही नागरिक एकाच वेळी दोन राज्यांच्या मतदार यादीत असू शकत नाही. याचा अर्थ असा की तो एकाच वेळी दोन राज्यांमध्ये मतदान करू शकत नाही. या नोंदी काढून टाकण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. जाणूनबुजून असे करणाऱ्यांवर कारवाईचीही तरतूद आहे. निवडणूक आयोग अशा मतदारांवर डुप्लिकेट नोंद कायद्याअंतर्गत कारवाई करू शकतो.