अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या मृत्यूनंतर 3 जणांची आत्महत्या, नेत्रदानासाठी उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 18:58 IST2021-11-05T18:58:30+5:302021-11-05T18:58:36+5:30
Puneeth Rajkumar Death: पुनीतच्या मृत्यूनंतर मोठ्या संख्येने लोक नेत्रदान करण्याची शपथ घेत आहेत.

अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या मृत्यूनंतर 3 जणांची आत्महत्या, नेत्रदानासाठी उचलले टोकाचे पाऊल
बंगळुरू: कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्या निधनाला एक आठवड्याहून अधिक काळ लोटला असला तरी त्यांचे चाहते अद्याप या दुःखातून सावरलेले नाहीत. कर्नाटकमध्ये आतापर्यंत 10 जणांचा पुनीत यांच्या मृत्यूच्या दुःखात मृत्यू झाला आहे. एवढेच नाही तर सुपरस्टारच्या पावलावर पाऊल ठेवत नेत्रदान करण्यासाठी तीन जणांनी आपला जीव गमावला आहे. पुनीत यांच्या निधनानंतर नेत्रदानाचा आलेख वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात नोंदवलेल्या 10 मृत्यूंपैकी 7 आत्महत्या आहेत, तर तीन लोकांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराच्या झटक्याने होते. याशिवाय तीन जणांनी नेत्रदानासाठी जीव दिला. तुमकूर येथील रहिवासी असलेल्या भरतने 3 नोव्हेंबर रोजी गळफास लावून घेतला. सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिले की, 'अप्पूच्या जाण्याचं दुःख मी सहन करू शकत नाही. मी त्यांच्यासोबत राहणार आहे. त्याच्याप्रमाणे माझेही डोळे दान करा.
बंगळुरू अर्बनमधील अणेकल येथे राहणाऱ्या राजेंद्रनेही नेत्रदान करण्यासाठी आत्महत्या केली होती. 31 ऑक्टोबर रोजी त्याने घरात गळफास लावून घेतला. रामनगर जिल्ह्यातील चन्नापटना येथील 26 वर्षीय व्यंकटेश यांनी 4 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या मृत्यूने त्यांना दु:ख झाले आणि तेव्हापासून जेवण सोडले होते, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
नेत्रदाते वाढले
नारायण नेत्रालयाचे डॉक्टर भुजंग शेट्टी यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले की, पुनीतच्या मृत्यूनंतर मोठ्या संख्येने लोक नेत्रदान करण्याची शपथ घेत आहेत. पूर्वी नेत्र रुग्णालयात जास्तीत जास्त 50 ते 100 अर्ज यायचे, मात्र गेल्या 3-4 दिवसांत नेत्रदानाची शपथ घेतलेल्या लोकांकडून किमान 100 अर्ज येत आहेत. आम्हाला गेल्या चार दिवसांत 14 जणांचे अर्ज आले आहेत, म्हणजे 28 डोळे आहेत. विशेषत: कोविडनंतर दिवसाला 1 किंवा 2 डोळे मिळणे कठीण होते, परंतु दान प्रकरणांमध्ये झालेली झपाट्याने झालेली वाढ ही एक विक्रम आहे. ही आकडेवारी केवळ एका नेत्रपेढीची आहे. राज्यभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे नेत्रदानाच्या अर्जांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.