CAA, NRCवरुन देशात वादंग माजला असताना मोदी सरकार NPRच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 10:04 AM2019-12-22T10:04:37+5:302019-12-22T10:06:16+5:30

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील मिळण्याची शक्यता

after citizen amendment act modi government started working on Npr | CAA, NRCवरुन देशात वादंग माजला असताना मोदी सरकार NPRच्या तयारीत

CAA, NRCवरुन देशात वादंग माजला असताना मोदी सरकार NPRच्या तयारीत

googlenewsNext

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन देशातलं वातावरण तापलं असताना आता मोदी सरकारनं राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीची (एनपीआर) तयारी सुरू केली आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एनपीआरबद्दलचा निर्णय होऊ शकतो. पश्चिम बंगाल आणि केरळ सरकारनं याला विरोध केला आहे. 

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत १ एप्रिल २०२० ते ३० डिसेंबर २०२० दरम्यान नागरिकांची माहिती गोळा केली जाईल. त्यासाठी घराघरात जाऊन जनगणना केली जाईल. देशातील नागरिकांची व्यापक माहिती गोळा करण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी केली जाणार आहे. या अंतर्गत लोकांची बायोमेट्रिक माहिती गोळा केली जाईल. 

एनपीआर आणि एनआरसीमध्ये बराच फरक आहे. देशात अवैध पद्धतीनं वास्तव्य करत असलेल्या लोकांची ओळख पटावी या उद्देशानं एनआरसी लागू करण्यात येणार आहे. तर विविध योजना राबवण्यात मदत व्हावी या हेतूनं राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी केली जाणार आहे. या अंतर्गत सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींची माहिती गोळा केली जाईल. 

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत एखाद्या बाहेरुन आलेल्या आणि सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून वास्तव्य करत असलेल्या व्यक्तीचीही माहिती गोळा केली जाईल. सरकारी योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूनं राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी करण्यात येणार आहे. 

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील यूपीए सरकारनं २०१० मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीची सुरुवात केली. २०११ मधील जनगणनेच्या आधी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचं काम सुरू झालं होतं. आता पुन्हा २०२१ मध्ये जनगणना होणार आहे. त्यामुळेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचं कामदेखील सुरू करण्यात येणार आहे. 
 

Web Title: after citizen amendment act modi government started working on Npr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.