"कौटुंबिक न्यायालये ही..."; मृत इंजिनिअरच्या आरोपांवर कायदा मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 10:59 IST2024-12-11T10:49:33+5:302024-12-11T10:59:50+5:30
अतुल सुभाष प्रकरणानंतर न्याय व्यवस्थेविरुद्धचा वाढता रोष पाहता कायदा मंत्रालयाने एका पोस्टमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

"कौटुंबिक न्यायालये ही..."; मृत इंजिनिअरच्या आरोपांवर कायदा मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण
Atul Subhash Death: बंगळुरुत पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता असलेल्या पतीने गळफास घेऊन जीवन संपवल्याचं प्रकरण चांगलेच तापलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल सुभाष नावाच्या अभियंत्याने २४ पानांचे पत्र आणि सुमारे दीड तासाचा व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींना आत्महत्येसाठी जबाबदार धरलं. या व्हिडीओमध्ये अतुलने देशातील न्यायव्यवस्था, पोलीस आणि कायद्यात पुरुषांकडे होणाऱ्या दुर्लक्षाबाबतही आपले मत मांडले आहे. याशिवाय त्यांनी जौनपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांवरही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर कायदा मंत्रालयाने याची दखल घेतली आहे.
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात कायदा आणि न्याय मंत्रालयाने मंगळवारी प्रतिक्रिया दिली. कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणे काळजी आणि संवेदनशीलतेने हाताळण्यास वचनबद्ध असल्याचे कायदा मंत्रालयाने म्हटलं आहे. अतुल सुभाष यांच्या आत्महत्येवरून लोकांमध्ये संताप निर्माण झाल्यानंतर मंत्रालयाने भूमिका स्पष्ट केली आहे.
मूळचे उत्तर प्रदेशचे असणारे अतुल सुभाष हे बंगळुरू येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करत होते. बंगळुरूमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून त्यांनी आपलं जीवन संपवलं. आत्महत्या करण्याआधी त्यांनी २४ पानी सुसाईड नोट लिहीली होती. यामध्ये त्यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांवर छळ केल्याचे आणि पत्नीने सेटलमेंटसाठी तब्बल ३ कोटी रुपयांची मागणी केल्याचे आरोप केले होते. यामध्ये सुभाष यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले होते. न्यायाधीशांनी खटला निकाली काढण्यासाठी ५ लाख रुपये मागितल्याचा आरोप अतुलने केला. तसेच दोन वर्षांत १२० वेळा सुनावणीसाठी कोर्टात जावं लागल्याचा दावा अतुलने केला.
न्याय व्यवस्थेवरील वाढता आक्रोश लक्षात घेता कायदा मंत्रालयाने एक्स पोस्टमध्ये आपलं म्हणणं मांडले आहे. “कौटुंबिक न्यायालये कुटुंबांमधील विवाद सोडवण्यासाठी एक समर्पित केलेलं व्यासपीठ आहे. लग्न, मुलांचा ताबा आणि वारसाशी संबंधित मुद्दे हे पारंपारिक औपचारिक न्यायालयीन शैलीशिवाय काळजी, संवेदनशीलतेने हाताळले पाहिजेत याचा इथं विचार केला जातो. त्यामुळे वेळेवर आणि उपायांवर लक्ष केंद्रित करा, तसेच कुटुंबांमधील संबंध सुधारण्यासाठी सलोख्याला प्रोत्साहन द्या," असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये अतुलची पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया, मेहुणा अनुराग सिंघानिया आणि काका सुशील सिंघानिया यांची नावे आहेत. अतुलचा भाऊ विकास कुमार याने बंगळुरूमधील मराठाहल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या आधारावर, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, कलम ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.