१५ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर २६/११चा आरोपी तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 07:28 IST2025-04-11T07:27:13+5:302025-04-11T07:28:07+5:30
दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात अमेरिकेसह आणखी काही देशांचेही नागरिक होते.

१५ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर २६/११चा आरोपी तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याचे अमेरिकेतून गुरुवारी भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. यासंदर्भात २०१० पासून अर्थात गेल्या १५ वर्षांपासून भारताकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना यश आले. राणाला घेऊन आलेले अमेरिकेचे गल्फस्ट्रीम जी ५५० हे विमान दिल्लीच्या पालम टेक्निकल एअरपोर्टवर उतरले. तिथून त्याला थेट एनआयएच्या कार्यालयात नेऊन नंतर पतियाळा हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात अमेरिकेसह आणखी काही देशांचेही नागरिक होते.
राणाला दिल्लीत आणणार असल्याने तिथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली. राणाला आणण्यासाठी एनआयए व रॉ यांच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक अमेरिकेला रवाना झाले होते. भारतात आणल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती एनआयएने दिली. भारत-अमेरिकेत झालेल्या प्रत्यार्पण करारांतर्गत राणाला अमेरिकेतील न्यायालयीन कोठडीत ठेवले होते. त्याने प्रत्यार्पण टाळण्यासाठी सर्व कायदेशीर पर्याय वापरले; पण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली.
दयान कृष्णन करणार सरकारी वकिलांच्या पथकाचे नेतृत्व
तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकी न्यायालयात भारत सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील दयान कृष्णन हे आता राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) वतीने दिल्लीतील न्यायालयातसुद्धा राणासंदर्भातील खटल्यात सरकारची बाजू मांडणार आहेत. त्याच्या प्रत्यार्पण प्रक्रियेशी कृष्णन हे २०१०पासून संलग्न आहेत. तर तहव्वूर राणाच्या वतीने वकील पीयुष सचदेवा बाजू मांडणार आहेत
मराठी वकील श्रीधर काळेही राणाविरोधात बाजू मांडणार : दिल्लीतील न्यायालयात राणाविरोधात बाजू मांडणाऱ्या सरकारी वकिलांचे नेतृत्व दयान कृष्णन करणार असून, त्यांना विशेष सरकारी वकील नरेंद्र मान साहाय्य करणार आहेत. शिवाय संजीव शेषाद्री व मराठी वकील श्रीधर काळे हेही सरकारी वकिलांच्या या चमूत असतील.
‘राणाला फाशी सुनावली जाण्याची शक्यता’ : या खटल्यात तहव्वूर राणा याला निश्चितच दोषी ठरविले जाईल. कदाचित त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय गृह खात्याचे माजी सचिव गोपालकृष्ण पिल्लई यांनी सांगितले. ते म्हणाले की, राणाच्या भारतातील चौकशीत अनेक गोष्टी स्पष्ट होतील.
प्रत्यार्पण कसे झाले?
२००८ - तहव्वूर राणा हा मुंबईत आला व त्याने ताजमहाल हॉटेलमध्ये वास्तव्य केले. २६/११च्या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी या व अन्य अनेक ठिकाणांवर हल्ले केले.
१८ ऑक्टोबर २००९ - एका धर्माच्या प्रेषिताची व्यंगचित्रे छापणाऱ्या वर्तमानपत्राच्या कार्यालयावर झालेल्या हल्लाप्रकरणी तहव्वूर राणा, डेव्हिड कोलमन हेडली या दोघांना अमेरिकी पोलिसांनी अटक केली.
१६ मे २०११ - तहव्वूर राणा याच्याविरोधात अमेरिकी जिल्हा न्यायालयात खटला सुरू झाला.
९ जून २०११ - २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट आखण्यासाठी माहिती तसेच अन्य मदत पुरविल्याच्या आरोपातून त्याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
१० जून २०११ - राणाची निर्दोष मुक्तता झाल्याने भारताची तीव्र नाराजी.
मार्च-एप्रिल २०१६ - मुंबई हल्ल्यात तहव्वूर राणाने बजावलेल्या भूमिकेबद्दलची माहिती डेव्हिड कोलमन हेडली याने व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यायालयाला दिली.
२१ जानेवारी २०२५ - भारतात प्रत्यार्पण करण्याविरोधात राणाने केलेली याचिका अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
१० एप्रिल २०२५ - तहव्वूर राणा याला भारतात दिल्लीमध्ये आणण्यात आले.