आदित्य सूर्याला म्हणाला, हॅलो...; वेग बदलल्यामुळे आदित्य एल१ गाठू शकला योग्य ठिकाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 05:49 AM2024-01-07T05:49:43+5:302024-01-07T05:50:34+5:30

लँगरेज पॉइंट-१ येथे राहील आदित्य एल १; पृथ्वी ते लँगरेज पॉइंट अंतर १५ लाख किमी आहे

Aditya said to Surya, Hello...; Due to the change in speed, Aditya L1 was able to reach the right place | आदित्य सूर्याला म्हणाला, हॅलो...; वेग बदलल्यामुळे आदित्य एल१ गाठू शकला योग्य ठिकाण

आदित्य सूर्याला म्हणाला, हॅलो...; वेग बदलल्यामुळे आदित्य एल१ गाठू शकला योग्य ठिकाण

लँगरेज पॉइंट १पर्यंत पोहोचायला आदित्य एल-१ला ११० दिवस लागले. या ठिकाणाहून ग्रहण किंवा अन्य कोणत्याही गोष्टीचा अडथळा न येता आदित्यला सूर्याचे अहोरात्र निरीक्षण करता येणार आहे. सूर्यावरील घडामोडींचा अंतराळातील हवामानावर काय परिणाम होतो याचा अभ्यास या मोहिमेत केला जाणार आहे.

बंगळुरू: देशाच्या पहिल्यावहिल्या सौर मोहिमेतील आदित्य एल १ हा उपग्रह पृथ्वी व सूर्य यांच्यातील गुरुत्वाकर्षण समतोल बिंदूंपैकी एक असलेल्या एल १ (लँगरेज पॉइंट-१) येथे शनिवारी यशस्वीरीत्या पोहोचला. हा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे.

असे करणार आदित्य एल-१ काम

आदित्य एल-१ या उपग्रहावर सात पेलोड आहेत. ते सूर्याचे सर्वात बाह्य आवरण (कोरोना), क्रोमोस्फिअर, फोटोस्फिअर यांचे निरीक्षण करणार आहे. एल-१ या पॉइंटवरून आदित्य एल-१मधील चार पेलोड सूर्याचे थेट निरीक्षण करू शकणार आहेत तर बाकीची तीन पेलोड एल १च्या परिसरातील पार्टिकल व तेथील वातावरणाचा अभ्यास करणार आहेत. सूर्यावरील घडामोडींचा विविध ग्रह, ताऱ्यांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास इस्रोच्या आदित्य एल-१ मोहिमेतून केला जाणार आहे. 

यानाचा वेग किती हाेता?

इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले की, आदित्य एल १ला हॅलो कक्षेच्या अधिक योग्य जागी ठेवण्यासाठी आम्हाला थोड्या दुरुस्त्या कराव्या लागल्या.  उपग्रहाचा योग्य दिशेने प्रवास होण्यासाठी प्रति सेकंद ३१ मीटर असा वेग ठेवावा लागला. हॅलो ऑर्बिटच्या नव्या कक्षेत आदित्यला नेमक्या जागी नेणे आवश्यक होते. जर त्याच्या वेगात सुधारणा केली नसती तर ते एल १ पॉइंटपासून दूर जाऊ शकले असते. ते आम्ही होऊ दिले नाही.

ही मोहीम मानव जातीसाठी अतिशय उपयोगी आहे. सूर्य व पृथ्वी यांच्याबद्दलच्या ज्ञानात भर घालणारी ही मोहीम आहे.
-द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती 

भारताने आणखी एक महत्त्वाची कामगिरी केली आहे. देशाची पहिली सौर वेधशाळा निश्चित स्थानी पोहोचली आहे. मानवतेच्या कल्याणासाठी उपयोगी अशा मोहिमा यापुढेही आखल्या जातील.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Web Title: Aditya said to Surya, Hello...; Due to the change in speed, Aditya L1 was able to reach the right place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.