Adani Port Protests: केरळमध्ये अदानी पोर्टला तीव्र विरोध; आंदोलकांच्या हल्ल्यात 29 पोलीस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 13:34 IST2022-11-28T13:33:14+5:302022-11-28T13:34:40+5:30
केरळमधील विझिंजम बंदराविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे.

Adani Port Protests: केरळमध्ये अदानी पोर्टला तीव्र विरोध; आंदोलकांच्या हल्ल्यात 29 पोलीस जखमी
Kerala Anti Port Protest:केरळमध्येअदानी बंदराच्या(Adani Port) बांधकामाला सुरू असलेला विरोध तीव्र होत आहे. रविवारी लॅटिन कॅथलिक चर्चच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी विझिंजम पोलीस ठाण्यावर हल्ला केला. यात 29 पोलिस जखमी झाले असून पोलिसांच्या अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाने पोलिस ठाण्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला आणि दगडफेक केली.
लोकांनी अदानी समुहाच्या बंदराला विरोध करत बांधकाम साहित्य घेऊन जाणारी वाहने अडवली. पोलिसांनी सांगितले की, एक गट बंदर प्रकल्पाला पाठिंबा देत आहे, तर दुसरा विरोधात आहे. त्यामुळे दोन गटात बाचाबाची झाली. पोलिसांनी आर्च बिशप थॉमस, जे नेट्टो, सहाय्यक बिशप क्रिस्तुराज आणि इतर धर्मगुरूंवर कट रचणे, हिंसाचाराला प्रवृत्त करणे आणि हत्येचा प्रयत्न अशा विविध आरोपांनुसार गुन्हा दाखल केला आहे. बंदर प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या आंदोलकांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 120 दिवसांहून निदर्शने सुरू आहेत. पोलिस म्हणाले की, आम्ही जास्तीत जास्त संयम दाखवला. पण रविवारी जमावाने पोलिस स्टेशनची तोडफोड केली आणि अधिकाऱ्यांवर हल्ला केला. 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसक आंदोलनासंदर्भात पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. लोकांच्या हल्ल्यात किमान 29 पोलिस जखमी झाले असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.