अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 05:26 IST2025-09-30T05:24:24+5:302025-09-30T05:26:00+5:30
आपल्या वाहनात बसून राहिल्याने घडली दुर्घटना; ६० जखमींवर उपचार सुरू

अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
करूर (तामिळनाडू)/नवी दिल्ली : २७ सप्टेंबर रोजी येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात दाखल एफआयआरमध्ये तमिळ वेत्री कळघमचे (टीव्हीके) नेते व अभिनेता विजय हे जाहीर सभेपूर्वी खूप वेळ आपल्या वाहनात जाणीवपूर्वक बसून राहिल्याने हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. यादरम्यान विजय यांना पाहण्यासाठी-ऐकण्यासाठी आतुर चाहत्यांची गर्दी वाढत गेली आणि चेंगराचेंगरी झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांची संख्या ४१ झाली असून, ६० जणांवर उपचार सुरू आहेत. मृतांत १८ महिला आहेत.
या घटनेवरून निर्माण झालेला तणाव पाहता पीडितांना भेटण्यासाठी विजय यांनी रुग्णालयात जाऊ नये, अशी सूचना पोलिसांनी केली. विजय यांच्याविरुद्ध कोणताही एफआयआर दाखल करण्यात आलेला नसला, तरी पक्षाचे करूर जिल्हा सचिव मथियाझागन, प्रदेश सरचिटणीस बुस्सी आनंद आणि सह सरचिटणीस निर्मल कुमार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हेमामालिनींच्या नेतृत्वाखाली भाजपची समिती
चेंगराचेंगरीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी भाजपने मथुराच्या खासदार हेमामालिनी यांच्या नेतृत्वाखाली एक नेमली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही समिती नेमली असून, ही समिती पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन दुर्घटनेच्या कारणांबाबत अहवाल तयार करेल. समितीत अनुराग ठाकूर, तेजस्वी सूर्या, ब्रिज लाल, श्रीकांत शिंदे, अपराजिता सारंगी, खा. रेखा शर्मा आणि टीडीपीचे पुट्टा महेश कुमार यांचा समावेश आहे.
दरम्यान, चेंगराचेंगरीबाबत समाजमाध्यमांवर अफवा पसरवल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तींनी सोशल मीडियावर खोटी माहिती व अफवा पसरवून लोकांमध्ये भीती व गोंधळ निर्माण केला.
अफवा पसरवू नका
या दु:खद घटनेबद्दल सोशल मीडियावर अफवा पसरवू नका, शांतता राखा, असे आवाहन मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केले आहे. कुणाच्याही बदनामीकारक पोस्ट करू नयेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
चीनकडून शोक व्यक्त
बीजिंग : करूर येथील या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून चीनने पीडित कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकून यांनी ही माहिती दिली.
राहुल गांधींची चर्चा
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. टीव्हीकेचे अध्यक्ष विजय यांच्याशीही चर्चा करून समर्थकांवर ओढवलेल्या प्रसंगाबद्दल दु:ख व्यक्त केले.