बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 17:37 IST2025-12-25T17:36:11+5:302025-12-25T17:37:03+5:30
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांची भेट आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निमंत्रणाला डावलणे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे

बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
पटना - बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. याठिकाणी राष्ट्रीय लोक मोर्चाचे ३ आमदार माधव आनंद, रामेश्वर महतो आणि आलोक सिंह यांनी पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांच्या निवासस्थानी झालेल्या लिट्टी चोखाच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली आहे. या तिन्ही आमदारांच्या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. आरएलएमचे तिन्ही आमदार पटना येथेच होते परंतु त्यांनी उपेंद्र कुशवाह यांच्या घरी कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. या तिन्ही आमदारांनी भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली होती त्यामुळे या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांची भेट आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निमंत्रणाला डावलणे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. हे आमदार नाराज असून ते सामूहिकपणे एखादा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत असं बोलले जाते. या आमदारांचे पुढील पाऊल काय असणार हे सध्या अस्पष्ट आहे. परंतु भाजपाचे नितीन नबीन यांच्यासोबत झालेली भेट औपचारिक असल्याचे सांगितले आहे. अलीकडेच आरएलएम आमदार रामेश्वर महतो यांच्या नाराजीच्या बातम्या समोर आल्या होत्या. रामेश्वर महतो यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिले की, "राजकारणात यश केवळ भाषणांनी मिळत नाही, तर खऱ्या हेतूंनी आणि मजबूत धोरणांनी मिळते. जेव्हा नेतृत्वाचे हेतू अंधुक होतात आणि धोरणे सार्वजनिक हितापेक्षा स्वार्थाकडे वळू लागतात, तेव्हा जनतेला गोंधळात टाकता येत नाही. आजचा नागरिक जागरूक आहे - तो प्रत्येक पाऊल, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक हेतू बारकाईने तपासतो असं त्यांनी म्हटलं होते.
मुलाला मंत्रिपद दिल्यानं कार्यकर्ते नाराज?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर महतो यांना उपेंद्र कुशवाहा मंत्रीपदासाठी बढती देतील अशी अपेक्षा होती. परंतु त्याऐवजी कुशवाहा यांचा मुलगा दीपक प्रकाश यांना मंत्री करण्यात आले. तेव्हापासून रामेश्वर महतो अस्वस्थ आणि संतप्त असल्याचं बोलले जाते. खरं तर उपेंद्र कुशवाहा यांनी त्यांच्या पत्नीला आमदारकीचे तिकीट देऊन त्यांना आमदार केले होते तर त्यांच्या मुलालाही सरकारमध्ये मंत्री बनवले होते. यामुळे पक्षातील काही नेत्यांमध्ये असंतोषाची ठिणगी पेटली आहे. आता तीन आरएलएम आमदारांनी लिट्टी-चोखा मेजवानीला उपस्थित न राहून अप्रत्यक्षपणे ही नाराजी दाखवून दिल्याचे बोलले जाते.
दरम्यान, उपेंद्र कुशवाह यांच्या घरी आयोजित या मेजवाणीकडे संघटना मजबुती आणि संवादाचा कार्यक्रम म्हणून पाहिले जात होते. त्यात पक्षाचे ३ आमदार गैरहजर राहिले त्यामुळे पक्षातील नाराजी उघडपणे दिसली. या आमदारांकडून अधिकृतपणे गैरहजेरीचे कोणतेही कारण देण्यात आले नाही. त्यात भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांची भेट घेणे त्यामुळे या दोन्ही घटना एकमेकांशी जोडल्या जात आहेत. येणाऱ्या काळात आरएलएमचे आमदार काही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत तर नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हे तीन आमदार भाजपात प्रवेश करणार का आणि जर केला तर त्यामुळे बिहारच्या राजकारणावर काय परिणाम होणार हे पाहणे रंजक ठरेल.