अभिषेक बच्चनची राजकारणात एन्ट्री? 2024 मध्ये या पक्षाकडून उतरू शकतो लोकसभेच्या रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 17:40 IST2023-07-15T17:40:05+5:302023-07-15T17:40:57+5:30
Loksabha Election : अभिषेक बच्चनचे पिताश्री अमिताभ बच्चन हे प्रयागराजचे खासदार होते. तसेच आई जया बच्चनही सपाच्या राज्यसभा खासदार आहेत.

अभिषेक बच्चनची राजकारणात एन्ट्री? 2024 मध्ये या पक्षाकडून उतरू शकतो लोकसभेच्या रिंगणात
लखनऊ - लोकसभा निवडणूक 2024 साठी देशातील सर्वच पक्ष कंबरकसून कामाला लागले आहेत. यातच आता बॉलिवुड अभिनेता अभिषेक बच्चन अमिताभ यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात उतरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अभिषेक बच्चनचे पिताश्री अमिताभ बच्चन हे प्रयागराजचे खासदार होते. तसेच आई जया बच्चनही सपाच्या राज्यसभा खासदार आहेत.
अभिषेक बच्चनच्या राजकारणात येण्यासंदर्भात राजकीय वर्तूळात जबरदस्त चर्चा सुरू आहे. अभिषेक उत्तर प्रदेशातून राजकारणात एन्ट्री करू शकतो, असे कयास लावले जात आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, तो प्रयागराज येथून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लोकसभेच्या आखाड्यात उतरू शकतो. मात्र यासंदर्भात अद्याप, ना सपाकडून अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे, ना बच्चन कुटुंबाकडून यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, सपाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबई दौरा केला होता.
अभिषेकच्या निवडणूक लढण्यासंदर्भात सपा -
अभिषेक बच्चनच्या प्रयागराज येथून निवडणूक लढण्यासंदर्भात समाजवादी पक्षाचे प्रवक्ते फखरुल हसन चांद म्हणाले, त्यांची आई जया बच्चन या सपाच्या राज्यसभा सदस्य आहेत. त्यांचे कुटुंब समाजवादी आणि समाजवादी विचाराचे आहे. अशा स्थितीत अभिषेक बच्चनच्या निवडणूक लढण्यासंदर्भातील निर्णय पक्षप्रमुख अखिलेश यादव आणि सपा नेतृत्वाला घ्यायचा आहे. पण, अभिषेक बच्चन यांनी निवडणूक लढवली तर चांगलेच होईल. ते निवडणूक चांगल्या प्रकारे लढतील. त्यांचे वडील अमिताभ बच्चन यांनीही निवडणूक लढवली आहे, असेही चांद यांनी म्हटले आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे, सध्या भाजपच्या रीता बहुगुणा जोशी या प्रयागराजच्या खासदार आहेत. रीता या माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन यांच्या कन्या आहेत. हेमवती नंदन यांना अमिताभ बच्चन यांना निवडणुकीत मदतही केली आहे.