आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 08:56 IST2025-06-24T08:55:47+5:302025-06-24T08:56:27+5:30

पोटनिवडणूक : भाजप, तृणमूल, काँग्रेसने राखली प्रत्येकी एक जागा

AAP won 2 assembly seats; BJP had staked its strength | आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला

आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली 
आम आदमी पक्षाने (आप) विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये ५ जागांपैकी २ (पंजाब व गुजरात) जागा जिंकून मोठा विजय मिळविला आहे. भाजपने सर्व पाच जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, फक्त गुजरातमधील काडी विधानसभा मतदारसंघातच भाजप उमेदवार राजेंद्र चावडा ३९ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले.

भाजपने विसावदर मतदारसंघ जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. येथे आपचे आमदार भूपेंद्र भयानी निवडून आले होते. त्यांनी राजीनामा देत २०२३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. येथे आपचे माजी प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किरीट पटेल यांचा १७ हजार मतांनी पराभव केला.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने कालिगंज मतदारसंघात पुन्हा विजय मिळविला. केरळमध्ये काँग्रेसने निलांबूरची जागा जिंकली. ही जागा वायनाड लोकसभा मतदारसंघात येते. येथे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी खासदार आहेत. त्यांनी या पोटनिवडणुकीत स्वतः प्रचार केला होता. येथे डावे पराभूत झाले.

राज्यसभेवर जाणार नाही

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपण राज्यसभेवर जाण्यास इच्छुक नसल्याचे म्हटले आहे. आपचे राज्यसभा सदस्य संजीव अरोरा यांनी लुधियाना पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता राज्यसभेची ही जागा रिक्त होत आहे.

या जागेवर कुणाला उमेदवारी द्यायची हे पक्षाची राजकीय निर्णय घेणारी समिती निश्चित करेल, असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीत आपच्या विरोधकांनी केजरीवाल आता राज्यसभेत अरोरा यांच्या जागी निवडून जातील, असा कयास मांडला होता.

Web Title: AAP won 2 assembly seats; BJP had staked its strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.