गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:35 IST2025-06-26T14:35:25+5:302025-06-26T14:35:51+5:30
AAP MLA Resigned: आपची कारवाई झालेली असली तरी त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. यामुळे बोटादमध्ये पोटनिवडणूक लागणार नाही. यापूर्वी भूपत भयानी यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.

गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत आपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. त्याने आमदारकीची शपथही घेतली नाही तोच आपच्या दुसऱ्या आमदाराने पदांचा राजीनामा दिला आहे. बोटादचे आमदार उमेश मकवाना यांनी आप हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतावरून भटकला असल्याचा आरोप करत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे आपने पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत मकवाना यांना पाच वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे.
मकवाना यांनी राजीनामा देताना मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन. मी बोटाडमधील लोकांमध्ये जाईन. काही लोकांना भेटून वेगळा पक्ष स्थापन करायचा की नाही यावर चर्चा करेन, असेही म्हटले आहे. तर प्रदेश अध्यक्ष इसुदान गढ़वी यांनी मकवाना यांच्यावर कारवाई केल्याचे जाहीर केले आहे. मकवाना यांनी मुख्य प्रतोद आणि राष्ट्रीय संयुक्त सचिव पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
ज्या काळात गुजरातमध्ये 'आप'ला कोणीही ओळखत नव्हते, त्या काळात मी सत्ताधारी भाजप सोडून आम आदमी पक्षात सामील झालो होतो. परंतू, पक्ष आंबेडकरांच्या सिद्धांतावरून भटकला आहे. राजीनाम्याचे हेच कारण असल्याचे मकवाना यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाविरुद्ध बंडखोरी आणि राष्ट्रीय नेत्यांवर बोट ठेवल्याने आपने ही कारवाई केली आहे.
आपची कारवाई झालेली असली तरी त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. यामुळे बोटादमध्ये पोटनिवडणूक लागणार नाही. यापूर्वी भूपत भयानी यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता मकवाना यांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिला आहे.