"भाजपाचा अयोध्येत पराभव झाल्याने मोदी आता जय श्रीराम म्हणत नाहीत, हिंदू धर्माला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 10:06 IST2024-07-10T09:58:00+5:302024-07-10T10:06:18+5:30
AAP Sanjay Singh And Narendra Modi : संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला.

"भाजपाचा अयोध्येत पराभव झाल्याने मोदी आता जय श्रीराम म्हणत नाहीत, हिंदू धर्माला..."
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. "भाजपा हा हिंसक विचारधारा असलेला पक्ष आहे. जिथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंसक विचारधारेला चालना देण्याचं काम करतात. भाजपाचा अयोध्येत पराभव झाला, त्यामुळे आता त्यांनी जय श्रीराम म्हणणं बंद केलं आहे" असं म्हणत संजय सिंह यांनी निशाणा साधला आहे.
TV9 च्या रिपोर्टनुसार, आप खासदार म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि भाजपा हिंदू धर्म आणि हिंदू समाजाला बदनाम करण्याचं काम करत आहेत. देशाचे पंतप्रधान मुजरा असा शब्द वापरतात. याशिवाय मुघल, मदरसा, मुस्लिम, घुसखोर असे शब्द उघडपण वापरून देशात द्वेष पसरवतात. मला विचारायचं आहे की, हिंदू धर्म म्हणतो धर्माचा विजय झाला पाहिजे, अधर्माचा नाश झाला पाहिजे, सजीवांमध्ये सद्भावना आणि जगाचे कल्याण व्हावे, असे हिंदू धर्म सांगतो. पण भारताचे पंतप्रधान सजीवांमध्ये चुकीची भावना निर्माण करत आहेत.
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह म्हणाले की, "भाजपा आणि पंतप्रधान मोदी यातून अजून शिकलेले नाहीत. त्यामुळे अयोध्या, सुलतानपूर, प्रतापगड, प्रयागराज, श्रावस्ती, कौशांबी, चित्रकूट, रामपूर, सीतापूर आणि नाशिक लोकसभा जागा गमावल्या. भारतातील प्रत्येक ठिकाण धर्माशी संबंधित आहे. तसेच, जे ठिकाण रामाचं आहे तिथून भगवान श्रीरामांनी भाजपाचा निर्धार ओळखून त्यांचा पराभव केला."
संजय सिंह यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला. मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, दलित, मागासवर्गीय, शेतकरी, पैलवानांना शिवीगाळ करतात. आता भाजपाचे नेते अयोध्येतील जनतेला शिव्या देत आहेत. पंतप्रधान मोदी जय श्रीराम म्हणत नाहीत. आता ते जय जगन्नाथ म्हणत आहेत. आता या लोकांनी जय श्रीराम म्हणणंही बंद केलं आहे, हे असे स्वार्थी लोक आहेत. तेव्हा अयोध्येने त्यांचा पराभव केला असल्याचं देखील संजय यांनी म्हटलं आहे.