Sanjay Singh : आपचे खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 18:02 IST2023-10-04T17:43:22+5:302023-10-04T18:02:34+5:30
AAP MP Sanjay Singh : संजय सिंह यांच्या निवासस्थानी ईडीच्या पथकाने सकाळी छापा मारला असून दिल्लीस्थित त्यांच्या निवासस्थानी तपासणी सुरू केली होती.

Sanjay Singh : आपचे खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. संजय सिंह यांच्या निवासस्थानी ईडीच्या पथकाने सकाळी छापा मारला असून, दिल्लीस्थित त्यांच्या निवासस्थानी तपासणी सुरू केली होती. दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणाच्या तपासासाठी ईडीचं पथक सकाळी सात वाजता संजय सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचलं होतं. दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये तीन ठिकाणी संजय सिंह यांच्या नावाचा उल्लेख आहे. यानंतर आता ईडीकडून त्यांना अटक करण्यात आली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याप्रकरणी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. 2024 च्या निवडणुका येत आहेत. त्यांना (भाजपा) माहीत आहे की, ते हरणार आहेत आणि हे त्यांचे हताश प्रयत्न आहेत. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी ईडी आणि सीबीआयसारख्या सर्व एजन्सी सक्रिय होतील, असे अरविंद केजरीवाल म्हणाले होते.
AAP MP Sanjay Singh arrested following the ED raid at his residence in connection with the Delhi excise policy case. pic.twitter.com/tvOxDaOg5b
— ANI (@ANI) October 4, 2023
"गेल्या एक वर्षापासून आम्ही पाहत आहोत की कथित मद्य घोटाळ्याबाबत आवाज उठत आहेत. 1000 हून अधिक छापे टाकण्यात आले, परंतु एक पैसाही जप्त झालेला नाही. ते फक्त घोटाळ्याचे आरोप करत राहतात. खूप चौकशी केली. पण काही सापडले नाही. वर्षभरापासून तथाकथित मद्य घोटाळ्याची चौकशी सुरू असून आजतागायत काहीही निष्पन्न झालेले नाही. संजय सिंह यांच्या ठिकाणीही काहीही सापडणार नाही."
"निवडणुका येत आहेत आणि 2024 च्या निवडणुकीत हे लोक पराभूत होत आहेत, असे त्यांना वाटते. त्यामुळे हरलेल्या माणसाचा हा शेवटचा हताश प्रयत्न असल्याचे दिसते. काल पत्रकारांवर कारवाई झाली आणि आज संजय सिंह यांच्यावर कारवाई झाली. निवडणुकीपर्यंत थांबा, कदाचित तुमच्याही बाबतीत असे होईल" असं देखील अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं.
मद्य धोरण घोटळ्या प्रकरणी मनीष सिसोदिया हे तुरुंगात आहेत. मनीष सिसोदिया यांना यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर मद्य घोटाळ्यामध्ये मनी लाँड्रिंगचा तपास करत असलेल्या ई़डीने त्यांना अटक केली होती. तेव्हापासून सिसोदिया तुरुंगात आहेत.