विधानसभा सभागृहातच काढले बंडल, पोत्यातून नोटा दाखवत AAP चे आमदार आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 14:05 IST2023-01-18T14:02:22+5:302023-01-18T14:05:56+5:30
रुग्णालयात विविध पदांच्या भरतीसाठी सरकारने ८० टक्के जुन्या कर्मचाऱ्यांना संधी देण्याचा सरकारचा निर्णय आहे.

विधानसभा सभागृहातच काढले बंडल, पोत्यातून नोटा दाखवत AAP चे आमदार आक्रमक
दिल्ली विधानसभा सभागृहात आज गोंधळ पाहायला मिळाला. आम आदमी पक्षाच्या आमदाराने थेट सभागृहातच पोत्यातून नोटांचे बंडल काढल्याने सारेच अवाक झाले. दिल्लीच्या राठला विधानसभा मतदारसंघातील मोहिंदय गोयल यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सभागृहात प्रश्न उपस्थित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नर्सिंग विभागासाठी भरती काढण्यात आली आहे. या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी केली जात असल्याचा गंभीर आरोप गोयल यांनी केला आहे. तसेच, याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
रुग्णालयात विविध पदांच्या भरतीसाठी सरकारने ८० टक्के जुन्या कर्मचाऱ्यांना संधी देण्याचा सरकारचा निर्णय आहे. मात्र, येथील रुग्णालयात सरकारच्या या आदेशाचे पालन होत नसून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करुन ही भरती होत असल्याचे आमदार गोयल यांनी विधानसभेत सांगितले. येथे नोकरी असतानाही कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार मिळत नाही. ठेकेदारच त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे उकळतात. याप्रकरणी कर्मचारी संपावर गेले आहेत, तेथेही त्यांना मारहाण करण्यात आली, अशी माहिती आमदार गोयल यांनी विधानसभेत दिली.
आमदार गोयल यांनी यासंदर्भात डीसीपी, मुख्य सचिव आणि उपराज्यपाल यांच्याकडेही याची तक्रार केली. संबंधितांनी माझ्यासोबतही सेटींग करण्याचा प्रयत्न केला, या घटनेच्या खुलाशासाठी मीही सेटींगमध्ये सहभागी झालो आणि डीसीपींना याबाबत माहिती दिली. मला १५ लाख रुपयांची लाच देण्यात येत होती. त्यासाठी, मी रंगेहात अटक व्हावी म्हणून डीसीपींना माहिती दिली. मात्र, कुठलीहीह कारवाई झाली नाही, असे गोयल यांनी विधानसभेत सांगितले. मी जीव धोक्यात घालून हे काम करत आहे, ते लोक मोठे गुंड असून माझ्या जीवाला धोका आहे, असेही आमदार महोदयांनी म्हटले आहे.
गोयल यांनी लाच म्हणून देण्यात आलेल्या नोटांचे बंडलच त्यांनी विधानसभेत दाखवले. दरम्यान, याप्रकरणी अद्याप विधानसभा अध्यक्षांनी कुठलीही कारवाई केली नाही. मात्र, आमदार गोयल यांची सुरक्षा वाढविण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. तसेच, याप्रकरणी चौकशीचेही आदेश देण्याची शक्यता आहे.