"मोदी जी चाय पकोडे", मोदींच्या भाषणाने प्रेरित होऊन युवकाने सुरू केला व्यवसाय, भावाला बनवले पोलीस अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 17:20 IST2022-10-14T17:17:59+5:302022-10-14T17:20:17+5:30
बिहारमधील युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने प्रेरित होऊन स्वत:चा व्यवसाय उभारला आहे.

"मोदी जी चाय पकोडे", मोदींच्या भाषणाने प्रेरित होऊन युवकाने सुरू केला व्यवसाय, भावाला बनवले पोलीस अधिकारी
Inspiration From PM Narendra Modi Speech । गया : बिहारमधील गया जिल्ह्यातील युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने प्रेरित होऊन स्वत:चा व्यवसाय उभारला आहे. गया जिल्ह्यातील चेरकी शेरघाटी मुख्य रस्त्यावर 'मोदी जी चाय पकोडे' हे दुकान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आत्मनिर्भर' भाषणाने प्रेरित होऊन स्थानिक बलवीर चंद्रवंशी नावाच्या तरुणाने छोट्या हॉटेलचा व्यवसाय सुरू केला. सुरूवातीला त्याची आजूबाजूच्या लोकांनी खूप खिल्ली उडवली, पण आज या बलवीरचे सर्वजण कौतुक होत आहे. चहा पकोडे विकून बलवीरने आज त्याच्या भावाला पोलीस अधीक्षक बनवले आहे. याशिवाय त्याने परिसरातील तरूणांना रोजगार दिला आहे.
बलवीर चंद्रवंशीने सांगितले की, इंटरमिजिएटचे शिक्षण घेतल्यानंतर चार वर्षांपूर्वी तो रोजगाराच्या शोधात कोलकाता येथे गेला होता. तिथल्या एका खासगी कंपनीत काही दिवस काम करूनही चांगली नोकरी न मिळाल्याने तो घरी परतला. कुटुंब चालवण्यासाठी पुढे काय करायचे ही चिंता त्याला शांत बसू देत नव्हती. याच कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी दिलेली भाषणे ऐकून त्याला प्रेरणा मिळाली. त्यानंतर तो आपल्या गावी आला. गावातच चहा पकोड्यांचे दुकान उघडले ज्यातून आज भरपूर कमाई होत आहे.
स्थानिक लोकांमध्ये दुकानाची क्रेझ
देशाचे पंतप्रधान मोदींच्या नावाने दुकान उघडले आणि शुध्द मोहरीच्या तेलात बनवलेले पकोडे बनवायला सुरूवात केली, जे इथे खूप प्रसिद्ध झाले आहेत. बलवीरने दुकानाच्या नावासोबत पंतप्रधान मोदींचा फोटो देखील लावला आहे. या रस्त्यावरून जाताना चहा आणि पकोड्यांचा शौकीन असणारा माणूस इथे नक्कीच थांबतो आणि याचा आस्वाद घेतो. या चहा पकोड्यांच्या दुकानातून आलेल्या पैशातून बलवीरने त्याच्या लहान भावाला शिकवून अधीक्षक बनवले असल्याचे बलवीरने सांगितले. याच वर्षी बलवीरचा लहान भाऊ जयंत कुमार याची पोलीस अधिकारी म्हणून निवड झाली आहे. खरं तर याचे संपूर्ण श्रेय जयंतने त्याचा मोठा भाऊ बलवीर चंद्रवंशी याला दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"