महिलांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 14:18 IST2025-10-31T14:16:54+5:302025-10-31T14:18:24+5:30
एका 'महिला मंडळ' व्हॉट्सॲप ग्रुपला लक्ष्य करून सायबर चोरांनी लग्नपत्रिका पाठवली. महिलांनी उत्सुकतेपोटी ही लिंक उघडताच त्यांचे व्हॉट्सॲप हॅक झाले अन्..

महिलांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
राजस्थानच्या भीलवाडा शहरातून सायबर क्राइमचा एक नवीन आणि अत्यंत धोकादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या भागातील एका 'महिला मंडळ' व्हॉट्सॲप ग्रुपला लक्ष्य करून सायबर चोरांनी लग्नपत्रिका पाठवली. महिलांनी उत्सुकतेपोटी ही लिंक उघडताच त्यांचे व्हॉट्सॲप हॅक झाले आणि मोबाईलचा संपूर्ण ताबा सायबर गुन्हेगारांच्या हाती गेला. ग्रुपमध्ये १५० हून अधिक महिला होत्या, त्यातील अनेक जणींचे मोबाईल फोन व ॲप्स हॅक झाले आहेत.
१६ ऑक्टोबर रोजी महिला मंडळाच्या एका सदस्याला त्यांच्याच मैत्रिणीच्या नंबरवरून लग्नाच्या आमंत्रण पत्राची एक लिंक आली. ती मैत्रिणीने पाठवली असल्याचे समजून त्यांनी जशी क्लिक केली, तसे त्यांचे व्हॉट्सॲप आपोआप अनइंस्टॉल झाले. मध्यरात्री ३ वाजता आलेल्या एका कॉलने तर फोन पूर्णपणे हँग झाला आणि सकाळी तपासणी केली असता, त्यांचा 'फोन पे'ॲप हॅक झाल्याचे आणि एसबीआय खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाले. सुदैवाने, बँकेच्या सुरक्षा प्रणालीमुळे मोठी चोरी टळली.
लिंक उघडताच मोबाईलचा ताबा गेला!
महिला मंडळाच्या सदस्या रीना जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी स्वयंपाकघरात काम करत असताना त्यांना ग्रुपमध्ये ही लग्नपत्रिका दिसली. ही ओळखीच्या व्यक्तीची पत्रिका असेल असे त्यांना वाटले. पण, काही मिनिटांतच ग्रुपवर एक संदेश आला की, ही लिंक बनावट आहे आणि कोणीही क्लिक करू नये. "हा इशारा थोडा जरी उशिरा आला असता, तर ग्रुपमधील अनेक महिलांची मोठी आर्थिक फसवणूक झाली असती," असे रीना जैन यांनी सांगितले.
याच ग्रुपच्या अन्य सदस्य ललिता खमेसरा यांनी सांगितले की, लिंक क्लिक करताच त्यांचे व्हॉट्सॲप आपोआप रिमूव्ह झाले आणि फोन हँग झाला.
हा आहे 'APK' फाईलचा धोका
तपासणीत समोर आले आहे की, ही फाईल साध्या इमेज किंवा पीडीएफ स्वरूपात नसून, 'एपीके' स्वरूपाची होती. एपीके फाईल ही ॲप इन्स्टॉल करण्यासाठी वापरली जाते. ही लिंक डाउनलोड होताच, ती थेट मोबाईलच्या सिस्टीममध्ये प्रवेश करते आणि सायबर ठगांना फोनचा संपूर्ण नियंत्रण मिळवून देते.
भीलवाडा येथील अशोक जैन यांनाही अशीच लिंक आली होती. मात्र, त्यांनी त्वरीत डाऊनलोड प्रक्रिया थांबवून आपल्या मुलाच्या मदतीने फोन तपासला आणि एपीके फाईल डिलीट केली. "हा सायबर फ्रॉड अत्यंत धोकादायक आहे, कारण तो लोकांच्या भावनांचा फायदा घेऊन फसवणूक करतो," असे ते म्हणाले. या गंभीर प्रकरणाची माहिती सायबर सेलला देण्यात आली असून, तज्ज्ञांनी लोकांना अशा कोणत्याही अनोळखी लिंकवर किंवा आमंत्रण पत्रावर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे.