'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 10:26 IST2025-10-18T10:26:12+5:302025-10-18T10:26:53+5:30
बॉम्बच्या माहितीमुळे रेल्वे विभागात घबराट पसरली आणि तब्बल ४५ मिनिटे संपूर्ण ट्रेनची तपासणी करण्यात आली.

AI Generated Image
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये सीटवरून झालेल्या एका क्षुल्लक वादातून रेल्वे विभागात मोठी खळबळ माजली. प्रवासादरम्यान वाद झालेल्या लोकांना अडकवण्यासाठी दोन सख्ख्या भावांनी रेल्वे कंट्रोल रूमला फोन करून ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती दिली. बॉम्बच्या माहितीमुळे रेल्वे विभागात घबराट पसरली आणि तब्बल ४५ मिनिटे संपूर्ण ट्रेनची तपासणी करण्यात आली. या तपासणीत काहीही संशयास्पद आढळले नाही. अखेरीस, जीआरपीने दोन्ही भावांना अटक करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
सीटच्या वादातून रचला कट
कानपूरच्या घाटमपूर येथे राहणारे दोन भाऊ अमृतसर-कटिहार धावणाऱ्या १५७०८ अम्रपाली एक्सप्रेसमधून प्रवास करत होते. याच वेळी त्यांचे डब्यातील सीटवर बसण्यावरून काही प्रवाशांसोबत जोरदार भांडण झाले. या वादातून संतापलेल्या दीपक चौहान नावाच्या व्यक्तीने रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ वर कॉल केला. त्याने रेल्वेत बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती दिली. चौहानने फोनवर सांगितले की, "डब्यात खिडकीजवळ काळ्या रंगाचे कपडे घातलेल्या तीन लोकांनी ट्रेनमध्ये टाइम बॉम्ब ठेवला आहे, जो कधीही फुटू शकतो."
तीन वेळा तपासणी, प्रवाशांची सुटका
रेल्वे कंट्रोल रूमला फोन करून लगेच त्याने आपला मोबाईल बंद केला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनामध्ये एकच गोंधळ उडाला. जीआरपी, आरपीएफ आणि एसीपी एलआययूने तात्काळ ट्रेनमध्ये कसून तपासणी मोहीम राबवली. रात्री १२ वाजेपर्यंत ट्रेनची तीन वेळा तपासणी करण्यात आली, पण काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. त्यानंतर ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली आणि बॉम्बची खोटी तक्रार दिल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या देवरिया आणि सिद्धार्थनगर येथील तीन प्रवाशांचीही सुटका करण्यात आली.
आरोपी भावांना अटक
यानंतर पोलिसांनी बॉम्बची अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. त्याच्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन ट्रेस करण्यात आले. कानपूरमध्ये ट्रेनमधून उतरल्यानंतर पोलिसांनी सर्व्हिलन्सच्या मदतीने लोकेशन ट्रेस केले आणि फेथफुलगंज परिसरातून दोन्ही भावांना अटक केली. पोलिसांनी या दोन्ही भावांची चौकशी केली असता, त्यांनी सीटवरून झालेल्या भांडणातून संबंधित प्रवाशांना अडकवण्यासाठी आपण ही खोटी माहिती दिल्याचे कबूल केले. जीआरपीने दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.