साडेतीन वर्षांचे बालक बनलेय महाकुंभाच्या चर्चेचे केंद्र; नवस फेडण्यासाठी आई-वडील गेलेले सोडून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:39 IST2025-01-10T17:38:21+5:302025-01-10T17:39:07+5:30
Mahakumbh 2025: एवढे छोटे बाळ, त्याची दिनचर्या लाडावलेली असेल असे तुम्हाला वाटत असेल. परंतू तसे नाही. तो साधुसंतांसारखे वागतो म्हणूनच त्याला संत पद देण्यात आले आहे. एवढा लहान संत...

साडेतीन वर्षांचे बालक बनलेय महाकुंभाच्या चर्चेचे केंद्र; नवस फेडण्यासाठी आई-वडील गेलेले सोडून
जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा महाकुंभाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. महाकुंभाची जागा ही वक्फ बोर्डाची असल्याचे दावे केले जात आहेत. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, आखाड्यांचे प्रमुख वक्फ बोर्डाच्या ताब्यात ही जमीन जाऊ देणार नाही, असे सांगत आहेत. अशातच अवघ्या साडे तीन वर्षांचा संत बनलेला गोंडस मुलगा चर्चेत आला आहे.
या साडेतीन वर्षांच्या संत बालकाचे नाव श्रवण पुरी असे आहे. या बालकाला संत पदाचा दर्जा जुना आखाड्याने दिला आहे. कारण या बालकामधील लक्षणे ही साधु संन्याशांसारखीच आहेत. श्रवण हा जुना आखाड्याच्या अनुष्ठानात सहभागी होतो. आरती करतो. त्याचे वागणे इतर लहान मुलांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. तो चॉकलेटऐवजी फळे खाण्यास पसंती देतो. तो इतर गुरु बंधुंसोबत खेळतो. बोबड्या बोलामध्ये तो श्लोक, मंत्र म्हणतो.
हा इथे कसा आला असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. हरियाणाच्या फतेहाबादमधील धारसूलच्या एका दाम्पत्याने फेब्रुवारी २०२१ मध्ये बाबा शाम पुरी यांच्या आश्रमात श्रवणला दान केले होते. तेव्हा या बालकाचे वय केवळ तीन महिन्यांचे होते. तेव्हापासून या आश्रमातील संतांनी त्याची काळजी घेतली, त्याच्यावर संस्कार केले. या दाम्पत्याचा कोणतातरी नवस पूर्ण झाला होता, तो फेडण्यासाठी त्यांनी या बालकाला दान केले होते.
संत आणि गुरु बंधुंसोबत तो राहतो. यामुळे त्यांचेच अनुकरण करत आहे. गुरुबंधू त्याची काळजी घेतात. यामुळे तो आध्यात्मिक झाला आहे. एवढ्या छोट्या वयाच्या संताला पाहून लोकही हैराण होत आहेत.
कशी आहे दिनचर्या...
एवढे छोटे बाळ, त्याची दिनचर्या लाडावलेली असेल असे तुम्हाला वाटत असेल. परंतू तसे नाही. आता थंडीचे दिवस आहेत म्हणून श्रवणला पहाटे पाच वाजता झोपेतून उठविले जाते. नाहीतर इतर दिवशी त्याला पहाटे चारलाच उठविले जाते. जुना आखाड्याचे महंत कुंदन पुरी सांगतात की, मुलांमध्ये देव असतात. हीच मुले साधुच्या रुपात आली तर ती जगासाठी कल्याणकारी ठरतात.