लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 17:16 IST2025-07-29T17:15:53+5:302025-07-29T17:16:56+5:30
Uttar Pradesh News: काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमधील बागपत येथील एका बाजारात व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. आता उत्तर प्रदेशमधीलच मथुरा येथे दोन दुकानदारांमध्ये लस्सीवरून तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे.

लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमधील बागपत येथील एका बाजारात व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. आता उत्तर प्रदेशमधीलच मथुरा येथे दोन दुकानदारांमध्ये लस्सीवरून तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. गिऱ्हाईकांना आपल्याकडे बोलावण्यावरून या दुकानदारांमध्ये वाद झाला त्यानंतर त्यांनी एकमेकांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार लाडली मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर दोन लस्सी विक्रेते ग्राहकांना आपापल्याकडे बोलावत होते. त्याचदरम्यान, त्यांच्यामध्ये काही कारणांवरून वाद झाला. त्यानंतर प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेलं. मात्र हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. तर दोन्ही पक्षांनी एकमेकांना लाठ्याकाठ्या दगड गोटे घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तसेच यामध्ये अनेकजण जखमी झाले. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे एवढं काही घडल्यानंतरही तिथे पोलीस मात्र अखेरपर्यंत आले नाहीत.
या घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी सुरेशचंद रावत यांनी सांगितले की, या घटनेचा व्हायरल झालेला व्हिडीओ आमच्या निदर्शनास आला आहे. त्यात दोन्हीकडून एकमेकांवर लाठ्याकाठ्या घेऊन हल्ले केले जात असल्याचं दिसत आहे. तसेच या हाणामारीत एक महिला जखमी झाल्याची माहितीही मिळाली आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.