बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 11:37 IST2025-10-02T11:37:06+5:302025-10-02T11:37:50+5:30
जन सुराज्य मोहिमेत सामील होताना जनार्दन यादव यांनी प्रशांत किशोर यांच्या दूरदृष्टी आणि दृष्टिकोनाबद्दल कौतुक व्यक्त केले

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
पटना - बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीनिमित्त सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच भारतीय जनता पार्टीला बिहारमध्ये झटका बसला आहे. अररिया जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि ४ वेळा आमदार राहिलेले जर्नादन यादव यांनी भाजपाची साथ सोडली आहे. प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वात जर्नादन यादव यांनी जन सुराज्य अभियानात प्रवेश केला आहे. प्रशांत किशोर यांनी औपचारिकपणे जर्नादन यादव यांना पक्षाचं सदस्यत्व दिले आहे.
जर्नादन यादव यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात जेपी आंदोलनापासून झाली होती. विद्यार्थी दशेपासून ते सक्रीय राजकारणात सहभागी होते, त्यानंतर हळूहळू त्यांचा भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये समावेश झाला. अररिया जिल्ह्यातील राजकारणात जर्नादन यादव यांचा चांगलाच प्रभाव आहे. इथल्या मतदारसंघात चार वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपाचा दबदबा असणारे ते नेते मानले जातात.
पराभवानंतर पक्षानं दूर लोटलं...
२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत हरल्यापासून भारतीय जनता पार्टीने जर्नादन यादव यांना पक्षात दुर्लक्षित ठेवले. संघटनेत सक्रीय सहभाग घेऊनही पक्षाच्या वरिष्ठांनी कायम दूर लाटले गेल असा आरोप त्यांचा आहे. त्यामुळेच दीर्घ काळ राजकारणाचा अनुभव असणारे जर्नादव यादव यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
जन सुराज्यकडून आशा
जन सुराज्य मोहिमेत सामील होताना जनार्दन यादव यांनी प्रशांत किशोर यांच्या दूरदृष्टी आणि दृष्टिकोनाबद्दल कौतुक व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, प्रशांत किशोर बिहारच्या राजकारणाला एक नवीन दिशा देण्यासाठी काम करत आहेत आणि मी या प्रवासाचा भाग होऊन राज्याच्या विकासात योगदान देऊ इच्छितो असं त्यांनी सांगितले. प्रशांत किशोर यांनी यादव यांचे स्वागत केले आणि जन सुराज्यमध्ये अनुभवी नेत्यांची भर पडल्याने चळवळ बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला.
भाजपासाठी मोठे नुकसान, कारण...
जनार्दन यादव यांचे जाणे हे पक्षासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. भाजपाला विशेषतः अररिया आणि सीमांचल प्रदेशात नुकसान होऊ शकते. यादव समुदाय आणि स्थानिक राजकारणावर जर्नादन यादव यांची मजबूत पकड या प्रदेशात जन सुराज्यला लक्षणीयरीत्या मजबूत करू शकते.